बिग बॉस फेम अभिनेत्री अर्शी खान (Arshi khan) नेहमीच चर्चेत असते. यंदा तिनं बाप्पाच्या आगमनानंतर आनंदानं गणपतीची पूजा केली. पूजेनंतर अर्शी खाननं आपले पारंपारिक लूकमधले आणि गणपती बाप्पाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. हे फोटो शेअर करत अर्शीनं आपल्या चाहत्यांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छाही दिल्या.
हे फोटो व्हायरल होताच अर्शीला ट्रोलिंगला तोंड द्यावं लागलं. फक्त हिंदूच नाही तर इतर जाती धर्मातील लोक आनंदानं गणेशोत्वसात सहभागी होऊन बाप्पाची मनोभावे सेवा करतात. पण आजही इतर धर्मातील लोकांनी गणपती बाप्पासह आपला आनंद साजरा केला की सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागतो.
मुस्लिम असल्याचा गर्व
इन्स्टाग्रामवर ट्रोलर्सने अर्शीला खूप वाईट साईट ऐकवलं. आता याचा निषेध करत अर्शी खानने एक व्हिडिओ शेअर केला आहे. अर्शीने ट्रोलर्सना स्पष्टपणे सांगितले की तिला मुस्लिम असल्याचा अभिमान आहे, पण ती भारतीय आहे म्हणून ती सर्व सण साजरे करेल.
अर्शी खानने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती तिच्या चाहत्यांना सांगत आहे, ' मी सुंदर पारंपारीक लूकमध्ये माझ्या मित्राच्या घरी गणपतीसाठी गेले होते. मला वाटलं की गणपतीसह फोटो पोस्ट केल्यावर तुम्हाला खूप आवडेल. पण घरी आल्यानंतर पाहिलं तेव्हा कळलं की, तुम्ही माझ्या या पोस्टवर ऊलट सुलट कमेंट करत आहात. मुस्लिम लोक मला एवढ्या शिव्या का देत आहेत? धर्म धर्म काय लावून ठेवलंय? कमेंट सेक्शनमध्ये हिंदू-मुस्लिम करणाऱ्यांनी चालते व्हा.'
व्हिडीओ शेअर करत अर्शी म्हणाली की...
'एक भारतीय म्हणून मला जो सण साजरा करायचा आहे तो मी साजरे करेन. ईद असो वा दिवाळी, ईव्ह असो. मला यातून अधिक आनंद मिळतो. कृपया मला काय करावे हे शिकवू नका. होय, मी मुस्लिम आहे आणि मला अभिमान आहे की मी मुस्लिम आहे, पण मी एक भारतीय देखील आहे. आणि मी सर्व सण साजरे करीन. आपणा सर्वांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा. मी प्रत्येकाला अशाच शुभेच्छा देत राहीन.'
गुलाबी साडीत दिसून आली अर्शी खान
वास्तविक, हा गोंधळ सुरू झाला ज्यावेळी अर्शीने गणपतीच्या मूर्तीसमोर उभं असलेला फोटो शेअर केला. या दरम्यान, अर्शीने आसामी शैलीची साडी परिधान केली होती जी निळ्या रंगाच्या ट्यूब ब्लाउजसह होती. या लूकमध्ये अर्शी खान खूप सुंदर दिसत होती, पण कदाचित ट्रोलर्सना तिचा हा लूक आवडला नसेल.