लहान मुले कधी काय करतील याचा नेम नाही. त्यांचे वय इतके खोडकर आणि खेळकर असते की ५ वर्षाचे होईपर्यंत त्यांच्याकडे डोळ्यात तेल घालून बघावे लागते. कधी ते कुठे चढतात तर कुठे उडी मारतात. अशाप्रकारे दंगा करणे कधी त्यांच्या जीवावर बेतणारेही ठरु शकते. लहान मुलांचा हट्टीपणा कधीकधी इतका वाढलेला असतो की खूपदा सांगूनही ते आपले ऐकत नाहीत आणि मग आपल्याला त्यांच्यामागे धावत त्यांच्याकडे लक्ष ठेवण्याची वेळ येते. मुलांचा दंगा कमी व्हावा यासाठी आपण एक ना एक उपाय करतो पण हा दंगा ती मोठी झाल्याशिवाय काही कमी होत नाहीत. नुकताच असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून यात या मुलाने केलेले कृत्य पाहून काही सेकंदांसाठी आपल्या काळजाचा ठोका चुकतो.
विशेष म्हणजे त्याच्या आईने दाखवलेल्या तत्परतेमुळे या मुलाचा प्राण वाचत असल्याचे दिसते. फिगन या ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून मदर ऑफ द इयर असे कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आले आहे. एक लहानसा मुलगा अगदी सहज चालत चालत स्विमिंग पूलमध्ये पटकन उडी मारतो. हा मुलगा उडी मारतो न मारतो तोच त्याची आई वेगाने स्विमिंग पूलच्या दिशेने जाते आणि अक्षरश: एका हाताने धरुन या मुलाला पूलच्या बाहेर काढते. विशेष म्हणजे मुलाला बाहेर काढताना ती त्याच्या टिशर्टला पकडून अगदी सहज त्याला बाहेर काढते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
Mother of the year! pic.twitter.com/TIXn8P85gx
— Figen (@TheFigen) April 30, 2022
मुलाने पाण्यात उडी मारल्यावर ही आई इतक्या वेगाने धावत जाते. की तीच पाण्यात पडते की काय असे आपल्याला वाटावे. मात्र ती अगदी पटकन मुलाला बाहेर काढते. त्यामुळे आईला मुलांकडे लक्ष देताना काय काय करावे लागते याचे उदाहरणच या व्हिडिओमधून आपल्याला दिसते. लहानग्याच्या आईने दाखवलेले तात्पर्य आणि त्याला वाचवण्यासाठी तिने केलेले धैर्य या गोष्टीचे सोशल मीडियावर बरेच कौतुक होताना दिसते. हा व्हिडिओ ४ दिवसांत १४ हजारांहून अधिक जणांनी पाहिला असून त्यावर अनेकांनी प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत. एक जण म्हणतो, ‘ जर स्पायडर मॅन खरंच अस्तित्वात असता तर इतक्या चातुर्याने काही करणे त्यालाही शक्य झाले नसते.’ दुसरा म्हणतो, ‘ मी अंधश्रद्धाळू नाही पण जेव्हा मुलांच्या सुरक्षेचा विषय येतो तेव्हा आयां सुपरह्यूमन होतात.’