आषाढी एकादशी ( Ashadhi Ekadashi 2022) जवळ येऊ लागली आहे, वारी चालणाऱ्या पावलांना आता विठ्ठल दर्शनाची आस आहे. वारी चालता चालताही मन पंढरपुराकडे धाव घेते. (Ashadhi wari) वारीत रात्रंदिवस चालत विठ्ठलाच्या नामस्मरणात तल्लीन झालेल्या वारकऱ्यांना आपल्या शारीरिक कष्टांतही सुख वाटते. रोज चालणं, ऊन-पावसाची तमा न बाळगता केवळ विठ्ठल भेटीच्या ओढीनं चालत राहतात आयाबाया-माणसं.( Ashadhi ekadashi Viral Video of Ashadhi Wari varkari and social workers)
वारकऱ्यांच्या या भक्तीमय वारीत त्यांचीच सेवा करुन माणुसकी जपण्याचं काम मात्र काही तरुण मुलंमुलंही करत आहेत. अलीकडेच एक व्हिडिओ व्हायरल झाला, वारी चालून थकल्याभागल्या पायांना, पावलांना तेल लावून मालिश करण्याचं काम काही मुलंमुली आनंदानं करताना दिसतात.
हा व्हिडिओ पाहून या मुलामुलींच कौतुकच नाही तर अभिमान वाटावा. वारीत दिवसरात्र चालून चालून थकलेल्या पायांना तेल लावून पाय चेपून देण्याचं काम हे तरुण तरुणी करताना दिसतात. अगदी कसलीही अपेक्षा न बाळगता केवळ सामाजिक बांधिलकी जपत हे लोक वारकरी मंडळीची मनापासून सेवा करत आहेत.
कोणी आजींच्या पायाला तेल लावून देत आहे. तर कोणी आजोबांची पाठ चेपत आहेत. आपल्या पायाला मालिश करणाऱ्या तरूणाच्या डोक्यावर हात ठेवून त्याला गोंजारणाऱ्या एक प्रेमळ आजी या व्हिडिओत दिसतील. लेकरानं मायेनं केलेली सेवा ही आजी गोड मानून घेते आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहेत आतापर्यंत २० लाखांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. 'खूप मस्त वाटलं हे चित्र पाहून, हीच भक्ती नी हीच संस्कृती, असेच प्रेम निरंतर राहू देत वारकऱ्यांवरही आणि कुटुंबावर, सलाम तुमच्या सेवा भाव वृत्तीला नी आपुलकीला सिंपली ग्रेट' अशी कमेंट एका सोशल मीडिया युजरनं केली आहे. मानव सेवा हीच ईश्वर सेवा हीच खरी ईश्वर सेवा अशा आशयाच्या कमेंट्स या व्हिडिओवर अनेकजण करत आहेत.