मूल ठराविक वयाचे झाले की त्याच्या शाळेच्या प्रवेशाची तयारी सुरू होते. मग जसजसा शाळेचा पहिला दिवस जवळ येतो तशी मुलांच्या आणि पालकांच्या छातीत धडकी भरायला सुरुवात होते. आपल्या आई-वडिलांसोबत राहणारे इवलेसे मूल पहिल्यांदाच नव्याने कुठेतरी जाणार असते. अशावेळी त्या मुलाला तर असुरक्षित वाटतेच पण पालकही मूल आपल्याला सोडून कसे राहिल याची काळजी करत असतात. एकमेकांना सोडून राहायचा हा पहिलाच प्रसंग असल्याने मूल शाळेत जाणार म्हणजे भावनिकरित्या वातावरण काहीसे ताणलेले राहते. सुरुवातीचे काही दिवस रडण्यात, शाळेला जायला नकार देण्यात जातात. पण एकदा या शाळेची, तिथल्या खेळांची, शिक्षकांची सवय लागली की मात्र मुलं आवडीने शाळेत जायला लागतात.
शाळेचा पहिला दिवस म्हणजे चहूबाजुंनी येणारे रडण्याचे आवाज अगदी नकोसे वाटतात. मूल शाळेत यावे, रमावे यासाठी शाळेच्या प्रवेशद्वारावर फुगे, चित्रं लावून सजावट करण्यात येते. मात्र तरीही मुलं रडायची थांबत नाहीत. अखेर शाळेतील शिक्षिका प्रेमाने मुलांना आत घेऊन जात याठिकाणचे वातावरण सुरक्षित असल्याचा दिलासा देण्याचा प्रयत्न करतात. काही वेळा त्या या कामात यशस्वी ठरतात पण काही वेळा सगळं काही करुनही मुलं रडतच राहतात. पण एका शिक्षिकेने आपल्या शाळेत येणाऱ्या मुलांचे असे काही छान स्वागत केले की ते पाहून मुलं तर खूश झालीच. पण तुम्हालाही या शिक्षिकेच्या कल्पकतेचे कौतुक वाटल्यावाचून राहणार नाही.
सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये एक शिक्षिका रांगेने वर्गात येणाऱ्या मुलांचे अतिशय छान स्वागत करताना दिसत आहे. कधी ती छोटीशी डान्सची स्टेप करते तर कधी थेट मुलांना मिठीच मारते. कधी एखादी उडी मारते तर कधी मस्त टाळी देऊन मुलांना वेलकम करते. तिची क्रिया पाहून मुलंही तशीच क्रिया करतात आणि अतिशय आनंदात वर्गात प्रवेश करताना दिसत आहेत. शिक्षिका आनंदात मुलांचे स्वागत करत असल्याने मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद आपण पाहू शकतो. त्या शिक्षिकेनं भिंतीवर एक चित्र लावलेलं आहे. त्यात काही खुणा आहेत. प्रेमानं मिठी मारायची, डान्स करायचा, हाय फाय द्यायचं, नमस्ते करायचं हे मुलं खुणेनं सांगतात आणि तसं ती करते. आपल्याला हवं तसं स्वागत झाल्यानं मूल खुश होतात. ट्विटरवर शेअर करण्यात आलेला हा व्हिडिओ आतापर्यंत ३४ लाख जणांनी पाहिला असून या शिक्षिकेचे कौतुक होताना दिसत आहे. अनेक जण मुलांच्या आणि शिक्षिकेच्या या गोंडस कृतींचे कौतुक करत व्हिडिवर प्रतिक्रिया देत आहेत. हा व्हिडिओ नेमका कोणत्या शहरातील कोणत्या शाळेतील आहे ते मात्र कळू शकले नाही.