वय वाढतं तसं व्यक्ती मोठी होत जाते. पण वयाच्या एका टप्प्यावर आपण कायम तरुण दिसावं आणि असावं असं प्रत्येकाला वाटतं. मात्र अशाच काळात आपल्याला कोणी मुद्दाम काकू किंवा आजी म्हणून हिणवलं तर आपल्याला ते अजिबात आवडत नाही. कोणत्याच व्यक्तीला आपल्या वाढलेल्या वयावरुन कोणी शेरेबाजी केलेली आवडत नाही. पण बॉलिवूड अभिनेत्री शमिता शेट्टी (Shamita Shetty) बिग बॉस-१५ व्या सीझनमध्ये (Big Boss Season 15) सहभागी झाली होती. यामध्ये ती टॉप ५ पर्यंत पोहोचली होती. पण या बिग बॉसच्या घरात आपल्याला एज शेमिंगचा (Age Shaming) सामना करावा लागला असं तिनं नुकतंच बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. (Shamita shetty about age shaming, Bigg Boss 15)
बिग बॉसमध्ये काही लोक शमिताला आंटी म्हणून शेरेबाजी करत होते. अशाप्रकारे एखाद्याला वयावरुन हिणवणे कितपत योग्य आहे. प्रत्येकजण कधी ना कधी वयाने मोठा होतच जाणार आहे मग अशा गोष्टींना काय अर्थ आहे असा मुद्दा शमिताने यावेळी उपस्थित केला. शमिता म्हणाली, "अशा शेरेबाजीमुळे मी थोडा काळ दुःखी झाले होते. जे लोक माझ्यावर अशी शेरेबाजी करत होते, ते सगळे सुशिक्षित होते. मात्र या सगळ्यातून तुम्ही काय संदेश देता? असं का बोललं गेलं हेच मला कळत नव्हतं. कारण तिथे काही लोक माझ्याच वयाचे होते. त्यामुळे जर तुम्ही मला आंटी म्हणत असाल तर तुम्हीही अंकल आहात. केवळ बिग बॉसच्या घरातच नाही तर बाहेरही येथील अनेकांनी मला आंटी म्हणून टोमणे मारले."
बिग बॉसचे प्रत्येक सिझन काही ना काही गोष्टींवरुन गाजत असतात. या शोमध्ये सहभागी झालेल्या व्यक्तींना दिलेले टास्क, या घरात राहणाऱ्यांमध्ये होणारे वाद यावरुन बिग बॉस नेहमी चर्चेत असते. १५ व्या सिझनमध्येही शमिता आणि अंतिम विजेती झालेली तेजस्वी प्रकाश यांच्यात बरेचदा वाद होताना दिसले. याठिकाणी आलेले कडू-गोड अनुभव सहभागी स्पर्धक शेअर करत असतात. त्याचप्रमाणे शमिताने या शोमध्ये तिला आलेले कटू अनुभव शेअर केले. इतकेच नाही तर या मुलाखतीत शमिता आपल्याकडे तुलनेने कमी काम असल्याने किंवा रिलेशनशिपमुळे आलेल्या डिप्रेशनबद्दलही बोलली. याबरोबरच बहिण शिल्पा शेट्टी आणि आपल्यामध्ये होणारी तुलना चुकीची आहे असेही ती म्हणाली.