बापलेकीच्या प्रेमाचे वर्णन शब्दात करणं कठीण! सुरूवातीच्या काळात मुलगा-मुलगीमध्ये केला जाणारा भेद आजकाल घटत चाललेला दिसून येतो. सोशल मीडियावर बदलत्या समाजाची आणि प्रत्येकाचा उत्साह वाढवणारी एक पोस्ट व्हायरल होत आहे. लेकीच्या वाढदिवसाला तिला ड्रेस, महागडे गिफ्ट देणारे वडील तुम्ही आतापर्यंत पाहिले असतील. पण एका माणसानं आपल्या लेकीच्या वाढदिवसाला अगदी मोठ्या मनाने रिक्षा प्रवास फ्री करण्याचे ठरवलं. (Auto Rickshaw Free on Daughter arpita's birthday people said salute to him)
११ ऑगस्टला अर्पिताचा वाढदिवस होता. तिचे वडील रिक्षा चालवतात. मुलीच्या वाढदिवसाच्या आनंदात त्यांनी जे केलं, ते करायला चांगली कमाई करणारे लोकही १० वेळा विचार करतील. खूप कमी लोक दुसऱ्यांना आनंद देऊन वाढदिवस साजरा करतात. फायदा, नुकसान याचा विचार न करता यांनी रिक्षा प्रवास फ्री केला.
रिक्षाच्या मागे लावलेल्या कागदावर लिहिलं होतं की, '' ' आज 11 ऑगस्ट 2023 आमची मुलगी राणी अर्पिता यादव हिचा वाढदिवस आहे. या आनंदात आज माझी रिक्षा आज फ्री आहे. कोणतेही भाडे द्यावे लागणार नाही. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.' त्याच्या रिक्षावरील हा संदेश वाचून लोकांनी त्याचे कौतुक केले.
फेसबुकवर अनेकांनी कौतुकास्पद कमेंट्स केल्या आहेत. आनंद साजरा करण्यासाठी तुम्हाला श्रीमंत असण्याची गरज नाही, तर तुम्ही जे काही करता ते मनापासून करायला हवे. एका युजरनं कमेंट केली आहे की, 'हा बाप जगातील सर्वात श्रीमंत माणूस आहे आणि मुलगी सर्वात भाग्यवान आहे.' ही रिक्षा नेमकी कुठली, याबाबत माहिती समोर आलेली नाही.