आई ती आईच असते, तिचे प्रेम आणि माया यांची तुलना कोणत्याही गोष्टीशी होऊ शकत नाही. मग ती आई माणसाची असो किंवा प्राण्यां-पक्ष्यांची. एरवी तर ती माया लावून आपल्या पिल्लांचे रक्षण आणि पालन-पोषण करतेच पण आपले बाळ एखाद्या अवघड प्रसंगात असेल तर मात्र ती अजिबातच त्याची साथ सोडत नाही. अनेकदा आपण एखाद्या लहानग्या लेकरासाठी आईची माया कशी असते ते पाहतो. मात्र प्राण्यापक्ष्यांची माया आपल्यापर्यंत पोहोचतेच असे नाही. पण सोशल मीडीयाच्या माध्यमातून जगभरात घडणाऱ्या गोष्टी एका क्लीकवर समजणे सोपे झाले असून नुकताच एक व्हिडिओ समोर आला आहे (Baby Horse was Stuck on a Bridge Mother Horse Refused to Leave him Alone).
आईची आपल्या पिल्लाप्रती असणारी माया एका व्हिडिओच्या माध्यमातून सोशल मीडियाद्वारे समोर आली असून हा व्हिडिओ बराच व्हायरल झाला आहे. तर त्याचे झाले असे की एक घोडी आणि तिचे पिल्लू एक लाकडी पूल पार करत आहेत. तेव्हा या घोडीच्या पिल्लाचा पाय या लाकडामध्ये अडकतो आणि ते खाली पडते. पाय काढण्यासाठी झटपट करत असताना कदाचित ते खाली पड़ते. यावेळी घोडी त्याच्या बाजूला उभी असल्याचे व्हिडिओमध्ये दिसते. घोडी चॉकलेटी रंगाची असून हे पिल्लू पांढरे आणि चॉकलेटी रंगाचे असल्याचे दिसते. पडल्यामुळे या पिल्लाचे तोंडही लाकडाच्या खाली गेल्याचे दिसते.
काही वेळाने एक व्यक्ती त्याठिकाणी येतो आणि या घोड्याच्या पिल्लाला उचलून बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करतो. पण त्या पिल्लाला ही व्यक्ती काय करतीये हे समजत नसल्याने ते सुरुवातीला फारसा प्रतिसाद देत नाही. मात्र नंतर ही व्यक्ती आपल्याला वाचवायला आली हे समजल्यावर ते अगदी सहज त्या व्यक्तीच्या हातात जाते. नंतर तर हा व्यक्ती या पिल्लाला चक्क कडेवर उचलून चालत पुढे नेत असल्याचेही व्हिडिओमध्ये दिसते. यावेळी घोडी बाजूला थांबून सगळा प्रकार पाहत असते. इतकेच नाही तर हा व्यक्ती पिल्लाला पुढे घेऊन जायला लागल्यावर ही आईही त्यादिशेने चालायला लागते. ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून त्याला ८० हजारहून अधिक जणांनी लाईक केले आहे.