आपलं बाळ एकदा रडायला लागलं की काय करावं आईला सुचत नाही. कोणत्या वेळेला ते कोणत्या गोष्टीसाठी रडते याचा काहीप्रमाणात आईला अंदाज असला तरी तेच ठोस कारण असेल असे तिही सांगू शकत नाही. कधी ते भुकेमुळे रडते, तर कधी झोप आल्यामुळे पण कधीकधी बाळ अचानक विनाकारणच रडत असते. बाळाला काय होते हे नेमके समजत नसल्यामुळे काय केल्याने ते थांबेल हे सांगताही येत नाही. मग मात्र आईची पूर्ण भंबेरी उडते. त्याला कितीही जोजवले, गाणी म्हटली, गोष्टी दाखवल्या तरी त्याचे रडणे काही थांबवायचे नाव घेत नाही. अशीच एका आईची बिकट अवस्था झाली आणि तिने त्यासाठी एक भन्नाट युक्ती वापरली.
रडणाऱ्या बाळाचा एक व्हिडियो नुकताच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. चीज स्लाईस डोक्यावर ठेवल्यामुळे बाळ रडायचे थांबले असे आपल्याला कोणी सांगितले तर आपल्याला खरे वाटणार नाही. पण खरंच असं घडलं. जोरजोरात रडणाऱ्या बाळाच्या टकलूवर त्याच्या आईने चीज स्लाईस टाकला आणि भोकाड पसरुन रडणारे बाळ एकाएकी रडायचे थांबले. रेडडिट यावर हा व्हिडियो पोस्ट करण्यात आला असून क्रिस किर्बी ८६ या अकाऊंटवरुन तो पोस्ट करण्यात आला आहे.
यामध्ये एक बाळ आपल्या बाबांच्या मांडीत बसल्याचे दिसत आहे. ते रडत असल्यामुळे बाबा त्याला जोजवत आहेत. पण काही केल्या ते थांबायचे नाव घेत नाही. तितक्यात तिकडून एक व्यक्ती एक चीज स्लाईस बाळाच्या दिशेने फेकते आणि हा स्लाईस बाळाच्या डोक्यावर पडतो. या घटनेनंतर बाळ अचानक रडायचे थांबते आणि त्याच्या डोळ्यात आश्चर्याचे भाव दिसायला लागतात. हा व्हिडियो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून बाळाला रडताना थांबवण्याचे नवे तंत्र असे म्हणून अनेकांनी या गोष्टीचे कौतुकही केले आहे. १५ ते १६ सेकंदांचा हा व्हिडियो पाहण्यासारखा असून हे गोंडस बाळ किती निरागसपणे प्रतिक्रिया देते ते पाहून आपणही काही वेळ आश्चर्यचकीत होतो.