ट्रेनने किंवा बसने प्रवास करताना बरेचदा आपण प्रवाशांमध्ये काही ना काही कारणाने भांडणे झाल्याचे पाहतो. कधी जागेवरुन, सामानावरुन तर कधी धक्का लागण्यावरुन ही भांडणे होतात. कधीकधी हे वाद इतके विकोपाला जातात की प्रवाशांमध्ये जोरदार हाणामारीही होते. मग मध्यस्थ किंवा पोलिस येऊन ही भांडणे सोडवतात. सहप्रवासी म्हणून आपण काही वेळा आपण ही भांडणे सोडवण्याचा प्रयत्न करतो, तर काही वेळा नुसतीच बघ्याची भूमिका घेतो. सोशल मीडियावर अशाप्रकारचे व्हिडिओ नेहमी व्हायरलही होतात. नुकताच असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, मात्र तो ट्रेन किंवा बसमधील नसून विमानातील प्रवाशांमध्ये हाणामारी झाल्याचा आहे (Bangkok Kolkata Flight Indian Fight in Mid Air Viral Video).
हा व्हिडिओ पाहून कदाचित आपल्यालाही हसू येऊ शकते. याचे कारण म्हणजे व्हिडिओच्या सुरुवातीला हे दोन व्यक्ती एकमेकांशी कशावरुन तरी वाद घालताना दिसतात. आणि नंतर हळूहळू त्यांचा आवाज वाढत जातो. यावेळी विमानातील एअर हॉस्टेस त्या दोघांनाही समजवण्याचा प्रयत्न करताना दिसते. पण ते अजिबातच ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसतात. थोडा वेळाने त्यांच्यातील वाद वाढतो आणि एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला जोरदार मारायला लागते. यावेळी मागून काही प्रवास येतात आणि तेही या व्यक्तीला मारायला लागतात. त्यावेळी एअर हॉस्टेस त्यांना शांत होण्यासाठी अक्षरश: गयावया करते पण ते दोघेही तिच्याकडे साफ दुर्लक्ष करतात.
बाजूला दुसरी एक एअर हॉस्टेस कोणाला तरी फोन लावून या घटनेबद्दल सांगतानाही दिसते. हा व्हिडिओ बँकॉक कोलकाता विमानातील असून थाई स्माईल एअरवेजच्या विमानात हा प्रकार घडला. मात्र या भांडणामुळे ही परदेशी एअर हॉस्टेस भलतीच घाबरलेली दिसते. आता भांडण नेमकं कोणत्या कारणावरुन झालं हे मात्र सांगता येत नाही. पण ही संपूर्ण घटना कॅमेरात कैद झाली आणि सोशल मीडियावर व्हायरलही झाली. 'इंडिया फॅक्टर न्यूज'च्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. अशाप्रकारे विमानात प्रवाशांची भांडणे आणि हाणामारी होण्याची ही पहिली वेळ नसून याआधीही अशाप्रकारच्या घटना घडल्या आहेत.