बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचा डान्स करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ नेटीझन्स मोठ्या प्रमाणात पाहत असून त्याला आपली पसंती असल्याचेही दर्शवत आहेत. हा व्हिडिओ राजस्थानचा असून जयपूर एअरपोर्टवर हे दृश्य कॅमेरात कैद झाल्याचे म्हटले जात आहे. शेख हसीना भारत दौऱ्यावर आल्य़ा असताना त्या नियोजनानुसार राजस्थानात गेल्या. त्यावेळी त्यांचे याठिकाणी जंगी स्वागत करण्यात आले. हसीना यांच्या स्वागतासाठी विमानतळावर राजस्थानी नृत्य करणाऱ्या कलाकारांनी आपली कला सादर केली. यावेळी शेख हसीना यांनाही कदाचित त्यांच्यात सहभागी होण्याचा मोह आवरला नसावा. त्यांनी या कलाकारांसोबत अतिशय उत्साहाने डान्सच्या काही स्टेप्स सादर केल्या (Bangladesh PM Sheikh Hasina Dance in Jaipur Airport Viral Video).
या राजस्थानी महिलांनी आपला घागरा चोली हा पारंपरिक वेश परिधान करत संगीताच्या तालावर ठेका धरला होता. त्याचवेळी हसीना यांनीही या तरुणींसोबत ठेका धरला आणि त्यांचे एकप्रकारे कौतुक केले. इतकेच नाही तर त्यानंतर हसीना यांनी या सगळ्या कलाकारांसोबत छानसा फोटोही काढला. यानंतर शेख हसीना अजमेरचे सूफी संत ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांच्या दर्ग्याचे दर्शन घ्यायलाही गेल्या. त्यांचा भारत दौरा वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असला तरी राजस्थानी डान्स हेही त्यातील एक महत्त्वाचे कारण होते. इंटरनेचवर शेख हसिना यांचा हा व्हिडिओ पाहून नेटीझन्सनी त्यांचे बरेच कौतुक केले आहे.
ट्विटरवर एक जण लिहीतो, ‘बांग्लादेशच्या पंतप्रधानांचा हा लूक भारताप्रती त्यांना असलेले प्रेम दाखवण्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे.’ तर दुसऱ्याने लिहीले आहे, ‘अतिशय सुंदर’, तिसरा लिहीतो, ‘अशाप्रकारे स्पोर्टींगली डान्स करणे हे किती छान आहे, त्यासाठी त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच.’ त्यामुळे एकूणच नेटीझन्सना शेख हसीना यांचा हा अंदाज पसंत पडला आहे असे म्हणायला हरकत नाही. न्यूज एजन्सी एएनआयने आपल्य़ा ट्विटर हँडलवरुन हा डान्सचा व्हिडिओ शेअर केला असल्याने काही वेळातच तो चांगलाच व्हायरल झाला. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीमध्ये शेख हसीना यांची भेट घेतली. बांग्लादेश भारताच्या विकासातील आणि व्यापारातील मोठा भागीदार आहे असे महत्त्वाचे वक्तव्य मोदी यांनी यावेळी केले. यावेळी भारत आणि बांग्लादेश यांच्यामध्ये अनेक महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या.