Join us  

स्वयंपाकघर कायम स्वच्छ-चकाचक ठेवण्यासाठी १ मिनिटांत करता येतील ४ गोष्टी, पसारा दिसणारच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2023 4:24 PM

Basic Kitchen Cleaning Hacks : रोजच्या धावपळीत सतत साफसफाई करणे आपल्याला शक्य होत नाही, अशाbवेळी काय करु शकतो याबद्दल

किचन ही आपल्या घरातील एक महत्त्वाची खोली असते. सकाळी झोपेतून उठल्यावरच्या चहापासून ते रात्री झोपताना दूध घेण्यापर्यंत असंख्य गोष्टींसाठी आपला किचनमध्ये वावर असतो. किचन ओटा, ट्रॉली, कपाटं, शेल्फ, स्वयंपाकाची भांडी, किराणा सामान, सिंक अशा सगळ्याच गोष्टी या किचनमध्ये असतात. सततचा स्वयंपाक, फोडण्या, सांडलवंड, पाणी आणि ओल्या कचरा यांमुळे किचन अनेकदा खूप खराब होऊन जाते. रोजच्या धावपळीत सतत त्याची साफसफाई करणे आपल्याला शक्य होत नाही. पण त्यामुळे त्यावर राप चढत जातो आणि ते जास्तीत जास्त खराब होत जाते (Basic Kitchen Cleaning Hacks). 

म्हणूनच किचन ओटा, सिंक, ट्रॉलीज, गॅस शेगडी आणि एकूणच किचन स्वच्छ राहण्यासाठी काही किमान गोष्टी केल्यास त्याचा चांगला उपयोग होतो. किचन अस्वच्छ असेल तर त्याठिकाणी होणाऱ्या माश्या, चिलटं आणि डास यांमुळे आरोग्याच्या दृष्टीने ते अजिबात चांगले नसते. तसेच घाणीमुळे बॅक्टेरीयाचे साम्राज्य होते आणि मग आजार पसरण्याची शक्यता असते. म्हणून किचन वेळच्या वेळी साफ केलेले केव्हाही जास्त चांगले. किचन स्वच्छ करायचे म्हणजे प्रामुख्याने कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यायचे समजून घेऊया... 

१. स्वयंपाक करण्याआधी ओटा साफ करा

आपण साधारणपणे स्वयंपाक करुन झाल्यानंतर ओटा धुते किंवा पुसून घेतो. स्वयंपाक करताना ओट्यावर काही ना काही सांडले असल्याने आपण असे करतो. हे जरी बरोबर असले तरी स्वयंपाकाच्या आधीही ओटा आणि गॅसची शेगडी साफ करायला हवी. कारण आधी त्यावर काही धूळ, घाण बसली असेल तर ती साफ केल्यानंतर स्वयंपाक केल्याने स्वच्छता जास्त चांगली राखली जाते. 

२. नियमितपणा ठेवा 

एक दिवस ओटा साफ केला, दुसऱ्या दिवशी गॅसची शेगडी साफ केली, तिसऱ्या दिवशी सिंक साफ केले, मग ट्रॉली, शेल्फ असे शेड्यूल ठरवून घ्या आणि त्याप्रमाणे एक एक गोष्ट साफ करत राहा. या साफसफाईमध्ये नियमितपणा ठेवला तर याठिकाणच्या सगळ्या गोष्टी योग्य रितीने साफ होत राहतात. 

३. किचनमधली कचरापेटी साफ करा

आपण किचन नीट साफ ठेवतो पण याठिकाणी असणाऱ्या कचरापेटीभोवती सतत चिलटं घोंगावत असतात किंवा त्याला मुंग्या लागलेल्या असतात. यातील ओल्या कचऱ्याचा वासही अनेकदा आपल्याला असह्य होतो. त्यामुळे किचनमध्ये असणारी कचरापेटी वेळच्या वेळी योग्य पद्धतीने साफ करायला हवी. 

४. इतर स्वच्छतेकडेही आवर्जून लक्ष द्या..

किचनची स्वच्छता करत असताना आपल्या हायजिन बाबतही काळजी घ्यायला हवी. त्यासाठी आपले हात स्वच्छ धुतलेले असायला हवेत. आपण घातलेले कपडे स्वच्छ धुतलेले असावेत. चॉपिंग बोर्ड आणि सुरी नेहमी स्वच्छ करुन एका बाजूला ठेवावी. तसेच आपण वापरत असलेली भांडी स्वच्छ आहेत की नाही याकडे बारकाईने लक्ष द्यावे. एकूणच किचनमधले लहानसहहान म्हणतानाच अनेक मुद्दे यामध्ये लक्षात घ्यायला हवेत. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडियास्वच्छता टिप्स