Join us  

बाथरूममधील टाईल्स अस्वच्छ दिसतात? ५ घरगुती उपाय, टाईल्स दिसतील स्वच्छ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2022 4:22 PM

Bathroom Tiles Cleaning Hacks घरातील इतर भागांप्रमाणेच बाथरूमची स्वच्छता ठेवणे खूप गरजेचे आहे. बाथरूमच्या घाणेरड्या फरशा आणि त्यावरील डाग अनेक संसर्गांना आमंत्रण देऊ शकतात.

घरातील बाथरूम ही एक अशी जागा आहे जिथे बऱ्याच प्रमाणात बॅक्टेरिया आढळून येतात. सूर्यप्रकाश नसलेल्या ठिकाणी आर्द्रतेमुळे बुरशी आणि डाग वाढतात. त्याची वेळेवर स्वच्छता न केल्यास आरोग्याच्या समस्याही वाढतात. बाथरुममध्ये जास्त घाण टाईल्सवर साचते. बाथरूमच्या पृष्ठभागावर, शॉवर यांच्या सभोवताली घाण वाढली की दुर्गंधी पसरते. कधी - कधी काही केल्याने टाईल्सवरील हट्टी डाग निघत नाही. तुम्ही देखील या समस्येचा सामना करत असाल तर या सोप्या मार्गानी तुम्ही बाथरुम साफ करु शकता.

व्हिनेगर

व्हिनेगर हट्टी डाग काढण्यासाठी मदतगार ठरते. यासाठी ½ कप व्हिनेगर आणि ½ कप पाणी मिसळून मिश्रण तयार करा. या मिश्रणाला बुरशी असलेल्या भागावर फवारणी करा आणि ब्रशने घासून घ्या. अशाने डाग नाहीसे होतील.

ब्लीच

ब्लीच बुरशी आणि हट्टी डाग लवकर नष्ट करण्यास मदत करते. यासाठी ¼ कप ब्लीच आणि 3/4 कप पाणी घ्या, याचे मिश्रण तयार करा. त्यानंतर टाइल्सवर फवारून चांगल्या पाण्याने धुवा. आपल्याला ब्लीच पूर्णपणे धुवून काढायचे आहे. ब्लीच करताना हातामध्ये ग्लोज परिधान करा.

अमोनिया

अमोनिया बाथरूममधील बुरशी आणि डाग काढते. प्रथम स्प्रे बाटलीत अमोनिया भरा. बाथरुममधील प्रत्येक भागात फवारणी करा. या घाणेरड्या भागांना ब्रशने स्क्रब करा आणि नंतर 2 तास तसेच ठेवून द्या. कोरडे झाल्यानंतर स्वच्छ करा.

बेकिंग सोडा

बाथरूमच्या टाइल्सवर साचलेली घाण साफ करण्यासाठी बेकिंग सोडा मदत करेल. प्रथम एका भांड्यात बेकिंग सोडा टाका, नंतर ओल्या स्पंजच्या मदतीने बेकिंग सोडा घ्या आणि बाथरूमच्या टाइल्स स्वच्छ करा. साफ केल्यानंतर, बाथरूमच्या टाइल्स गरम पाण्याने धुवा.

लिंबाचा रस

लिंबाचा रस बाथरूमच्या टाइल्स स्वच्छ करण्यास मदत करते. लिंबू हे अम्लीय स्वरूपाचे आहे, जे बाथरूमच्या टाइल्सचे हट्टी डाग काढून टाकते. बेकिंग सोडासोबत लिंबाचा रस मिसळूनही तुम्ही टाइल्स साफ करू शकता.

टॅग्स :स्वच्छता टिप्सहोम रेमेडी