केंद्रिय मंत्री व अभिनेत्री स्मृती इराणी वेगवेगळ्या गोष्टींमुळे कायमच चर्चेत असतात. कधी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील एखाद्या पोस्टमुळे तर कधी काही मिम्स शेअर केल्यामुळे. आता त्यांच्या पोस्टची चर्चा होत आहे ती त्यांनी केलेल्या एका मोटीवेशनल पोस्टमुळे. सोशल मीडियावरही त्या बऱ्याच अॅक्टीव असल्याचे पाहायला मिळते. नुकतीच त्यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट केली असून आपल्या चाहत्यांना प्रेरणा ठरेल अशा या पोस्टला नेटीझन्सची भरपूर पसंती मिळत आहे. या पोस्टमध्ये त्या म्हणतात, "तुम्ही सतत उदास राहू शकत नाही. तुम्हाला असलेल्या भितीचा सामना करण्यास तुम्ही रोज नकार देऊ शकत नाही, म्हणजेच तुम्हाला त्या गोष्टींचा सामना करावाच लागतो. रोजच तुम्ही दु:खाने वेढलेले असता आणि त्यामुळे तुम्ही निष्क्रीय होता असे नाही. एक दिवस या भितीतून आणि दु:खातून तुम्ही उठाल, तो दिवस आजचाच असू दे" असा सल्लाही त्या जाता जाता देतात.
तर या पोस्टबरोबर शेअर केलेल्या फोटोमध्येही एक छान मेसेज लिहीलेला आहे. तो असा, “तुम्ही किती चुका करता किंवा तुमची प्रगती किती संथगतीने होते हे महत्त्वाचे नाही, तुम्ही सगळ्यांपेक्षा नेहमीच पुढे आहात कारण इतर लोक प्रयत्नच करत नाहीत.” २० तासांपूर्वी केलेल्या या पोस्टला १० हजारांहून अधिक लाईक्स आले आहेत. स्मृती इराणी यांना सोशल मीडियावर फॉलो करणाऱ्यांची संख्या जास्त असून त्यांच्या प्रत्येक पोस्टला नेटीझन्सचा अतिशय चांगला प्रतिसाद मिळतो.
याआधी त्यांनी भारताचे सीडीएस बिपिन रावत यांना श्रद्धांजली वाहणारी आणि त्यांच्यासोबत असलेले नाते सांगणारी पोस्ट केली होती. स्मृती इराणी यांची प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून आपल्याला जुनी ओळख असली तरी आता त्या राजकारणात चांगल्याच रमल्याचे दिसते. वयाच्या २१ व्या वर्षी अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवल्यानंतर एकता कपूरच्या ‘क्योंकी सास भी कभी बहू थी’ या मालिकेमुळे त्या घराघरांत पोहोचल्या होत्या. तर २००३ मध्ये त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी भाजपातील अनेक महत्त्वाची पदे भूषवली.