अंगावर पिणाऱ्या बाळासोबत अनेक कारणांमुळे बाळाला घेऊन आईला प्रवास करावा लागतो. रेल्वे, बस, विमान, सरकारी कार्यालयं, बसस्थानकं , रेल्वेस्थानकं, विमानतळ अशा सार्वजनिक ठिकाणी कामानिमित्त महिलांना त्यांच्या लहान बाळासह घराबाहेर पडावंच लागतं. बाळाला दर दोन तीन तासांनी भूक लागतेच. पोट भरलेलं असलं, की बाळाचं मन रमतं. एकतर ते झोपतं नाहीतर छान खेळतं. रडरड करत नाही. पण भूक लागल्यावर बाळ रडतं आणि सार्वजनिक ठिकाणी वावरणारी बाळाची आई पेचात पडते. बाळाच्या भुकेनं तिचा जीव कासाविस तर होतो, पण बाळाला असं चारचौघात कसं पाजायचं, कुठे बसायचं असा प्रश्न तिला पडतो. एखाद्या ठिकाणी भेटलाच आडोसा तर कितीही पाठ करुन, ओढणी/ पदर झाकून बसलं तरी आपल्याला कोणी पाहाणार तर नाही ना, ही भीती तिला मनात छळत असते. त्यामुळे पूर्णपणे बाळावर लक्ष केंद्रित करुन ती बाळाला नीट दूधही पाजू शकत नाही. कसंबसं दूध पाजून तिला उठावं लागतं. अशा घाईत बाळाचं पोट भरतंच असं नाही. मग बाळाची रडरड आणि आईची तगमग सुरु होते.
Image: Google
अशा प्रसंगांना सार्वजनिक ठिकाणी लहान बाळासोबत वावरणाऱ्या आईला सामोरं जावं लागतं. कधी कोणी आपल्याला बाळाला दूध पाजताना बघेल ही केवळ तिच्या मनातली भिती असते. प्रत्यक्षात तिथे कोणीच नसतं, तर कधी खरोखर विचित्र नजरेने न्याहाळणारे पुरुष असतात. पण हे असं होतं हे माहीत असल्यानं कोणी नसलं तरी ते दडपण आई असलेल्या स्रीच्या मनावर असतंच.
आपण सार्वजनिक ठिकाणी वावरतो, मधेच आपल्याला भूक लागली तर आपण आपल्या बॅगेतला डबा काढून खायला लागतो, किंवा काही विकतचं घेऊन खातो, किती साधी गोष्ट आहे ही. तेव्हा कोणी पाहिल ही भीती नसते. पण सार्वजनिक ठिकाणी वावरताना इतका सहज विचार आईला आपल्या बाळाच्या भुकेचा करता येत नाही. कारण आई असलेल्या बाईला असते विचित्र नजरांची धास्ती. सार्वजनिक ठिकाणी स्तनापन करणाऱ्या स्त्रीकडे रोखल्या जाणाऱ्या विचित्र नजरांकडे दुर्लक्ष करणं, किंवा त्या नजरांचा संकोच बाळगून आपल्या बाळाच्या भूकेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणं या दोनच गोष्टी बाईच्या हातात असतात. असे विचित्र नजरा रोखणारे मात्र बिनधास्त वावरतात.
हे चित्रं, हा अनुभव सर्व ठिकाणी सारखाच असला तरी इंग्लंड आणि वेल्स येथे मात्र अशा विचित्र कृतीसाठी शिक्षेची तरतूद केली आहे.
Image: Google
इंग्लंड आणि वेल्स या दोन देशात सार्वजनिक ठिकाणी स्तनपान करणाऱ्या आईचा फोटो तिच्या परवानगीशिवाय काढता येणार नाही. आणि जर असे फोटो काढले गेले तर मात्र त्याला 2 वर्षांची कैद होवू शकते. 4 जानेवरीला इंग्लंडमधल्या संसदेसमोर हा शिक्षेचा प्रस्ताव ठेवण्यात आला आणि येथील न्याय मंत्रालयानं संशोधनाच्या स्वरुपात अशा शिक्षेची तरतूद् केली. हा कायदा संशोधन स्वरुपातला असला तरी हा कायदा, पोलिस, गुन्हा, शिक्षा आणि न्यायालय विधेयकाचा एक प्रमुख भाग असेल असं म्हटलं गेलं. न्याय सचिव डाॅमिनिक रॅब यांनी असा कायदा आणि या कायद्यातील शिक्षेची तरतूद ही सार्वजनिक ठिकाणी आपल्या लहान बाळांसमवेत वावरणाऱ्या महिलांची मदत करेल. ज्या महिलांना आपल्या तान्ह्या बाळांना दूध पाजताना त्रास होतो, समोरचा जेव्हा स्वत:च्या सुखासाठी/ आनंदासाठी म्हणून स्तनपान करणाऱ्या स्त्रीचं छायाचित्रं काढत असेल अशा महिलांन होणारा त्रास थांबवण्यासाठी आणि सार्वजनिक ठिकाणी आपल्या तान्ह्युल्यासह वावरताना त्यांना सुरक्षित वाटावं, म्हणून ही शिक्षेची तरतूद असल्याचं डाॅमिनिक रॅब यांनी म्हटलं आहे. सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही दडपणाविना , संकोचाविना आईला बाळला स्तनपान करता यायला हव. सार्वजनिक ठिकाणी स्तनपान करणाऱ्या महिलांचे विना परवानगी फोटो काढणाऱ्यांवर कारवाई व्हावी, या मागणीसाठी 2021च्या एप्रिलपासून एक मोहीम येथे सुरु होती.
Image: Google
काय होतं मोहिमेचं कारण?
या मोहिमेच्या मुळाशी मॅंचेस्टर येथील फॅशन डिझायनर जूलिया कूपर या महिलेची तक्रार होती. जूलिया कूपर आपल्या 9 महिन्याच्या मुलीला घेऊन मैत्रिणीसह स्थानिक पार्कमधे बसली होती. मुलीला भूक लागली म्हणून तिने तिला पाजायला सुरुवात केली. तेव्हा तिला तिला शेजारच्या बेंचवर बसलेला एक इसम आपल्याला विचित्र नजरेने रोखून बघत आहे, हे लक्षात आलं. त्याला टोकण्यासाठी म्हणून तिनं माग बघितलं, तेवढ्या वेळात त्याने आपला डिजिटल कॅमेरा काढला आणि त्यातील झूम लेन्सद्वारे तिच्या परवानगीशिवाय तिचे फोटो काढले. ही बाब जुलियाला विचित्र वाटली, पटली नाही, तिला खूप असुरक्षित जाणवलं.
Image: Google
जुलियाने ही तक्रार लेबर पक्षाचे स्थानिक खासदार जेफ स्मिथ आणि त्यांची सहयोगी स्टेला क्रेसीला संपर्क करुन हा सर्व प्रकार सांगितला. असा अनुभव खुद्द खासदार यांची सहयोगी स्टेला क्रेसी यांनी रेल्वे प्रवासात अनुभवला होता. त्यामुळे जुलियाचा त्रागा त्यांना लक्षात आला आणि अशा प्रकाराविरुध्द शिक्षेच्या तरतूदीसाठी मोहीम सुरु झाली. खासदार जेफ स्मिथ आणि स्टेला क्रेसी यांनी ही घटना हाऊस ऑफ काॅमन्सपर्यंत नेली. तिथे सार्वजनिक ठिकाणी स्तनपान करणाऱ्या महिलांच्या परवानगीविना त्यांचा फोटो काढणं अनाधिकृत समजलं जाऊन त्यासाठी शिक्षेची तरतूद असावी, अशी याचिका दाखल केली गेली.
Image: Google
न्यायालयानंही या याचिकेची गंभीर दखल घेऊन आपल्या देशातील महिलांच मान सन्मान आणि त्यांच्या सुरक्षिततेचा हक्क नीट जोपासला जावा यासाठी विना परवानगी स्तनपान करणाऱ्या महिलांचा फोटो काढणं या कृतीला इंग्लड आणि वेल्स येथे 'विशिष्ट 'स्तनपान अपराध मानला जाऊन, या गुन्ह्यासाठी गुन्हेगाराला दोन वर्षं तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतद केली गेली. इंग्लंड,वेल्स, स्काॅटलॅण्ड आणि नाॅर्थन आर्यलण्ड हे चार देश युनायटेड किंगडमचा भाग आहे. प्रत्येक देशाला त्यांचं स्वतंत्र सरकार आणि अधिकार आहेत. इंग्लंड आणि वेल्स यांनी आपल्याकडील अधिकारांचा उपयोग सार्वजनिक ठिकाणी बाळासह वावरणाऱ्या आयांना सुरक्षितता जपण्यासाठी, त्यांचा आत्मसन्मान जपण्यासाठी वापरुन संशोधनाच्या स्वरुपात एक कायदा मंजूर करुन त्यात शिक्षेची तरतूद केली.
हे असे कायदे जगभर होण्याची आज गरज आहे, अशी प्रतिक्रिया इंग्लंड आणि वेल्स या देशांनी केलेल्या कायदा आणि शिक्षेची तरतूद याबाबत बातमी वाचून जगभरातल्या महिलांकडून व्यक्त केली गेली.