पूर्वी भाऊबीज म्हटलं की बहिणीने भावाला ओवाळायचं आणि भावानं बहिणीला ओवाळणी द्यायची अशी रीत होती. पण काळ बदलला आणि स्त्रियाही कमवायला लागल्या. मग आपणच का नेहमी भावाकडून गिफ्ट घ्यायचं. भावालाही आपण देऊया की म्हणत महिला वर्ग आपल्या लाडक्या भावासाठी खरेदी करु लागला. भाऊबीजेच्या दिवशी आपल्या लाडक्या भाऊरायाला देण्यासाठी काय पर्याय असू शकतात असा प्रश्न तमाम महिलावर्गापुढे असतो. आता भावांना काय आवडेल आणि ते आपल्या बजेटमध्ये कसे बसेल हे गणित जुळवणे काहीसे अवघड असते. यासाठीच पाहूया मुलांना गिफ्ट म्हणून देता येतील असे सोपे पर्याय (Bhaubeej Gift Ideas for Brothers In Diwali)...
१. वॉलेट
पुरुष साधारणपणे वॉलेट नक्की वापरतात. लेदरची ब्रँडेड किंवा लोकल ब्रँडचीही अतिशय छान वॉलेटस बाजारात मिळतात. अतिशय आवश्यक असलेले हे वॉलेट आपण ऑनलाईन आणि ऑफलाईनही खरेदी करु शकतो.
२. टिफिन बॉक्स किंवा पाण्याची बाटली
तुमचा भाऊ शिकत असेल किंवा नोकरी करत असेल तर त्याला डबा आणि बाटली या अतिशय आवश्यक गोष्टी असतात. प्रवासात डब्यातील पदार्थ सांडू नयेत यासाठी चांगल्या डब्यांची आवश्यकता असते. तुम्हाला भावाला उपयुक्त आणि रोज तुमची आठवण यावी असं काही हवं असेल तर टिफिन बॉक्स किंवा पाण्याची चांगली बाटली हा चांगला पर्याय असतो.
३. हेडफोन्स
हेडफोन्स ही सध्या अतिशय अत्यावश्यक गोष्ट झाली आहे. बाजारात वायरलेस प्रकारातील बरेच हेडफोन्स मिळतात. यामध्ये वेगवेगळे ब्रँड, रंग आणि प्रकार पाहायला मिळतात. गाडीवर, ट्रेनने किंवा कॅबने प्रवास करताना फोन उचलण्यासाठी किंवा काही ऐकण्यासाठी हे हेडफोन्स फायदेशीर ठरतात.
४. बेल्ट
मुलांना पँटला लावायला नियमितपणे बेल्ट लागतात. यामध्ये काळा, चॉकलेटी, ऑकर अशा वेगवेगळ्या रंगाचे बेल्ट येतात. जिन्सवरही हे बेल्ट खूप छान दिसतात. त्यामुळे तुम्हाला गिफ्ट म्हणून काही द्यायचे असेल तर बेल्ट हा उत्तम पर्याय ठरु शकतो.