महिलांना काही धार्मिक स्थळांमध्ये प्रवेशासाठी बंदी असताना प्रवेश मिळावा यासाठी आंदोलन उभे करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या म्हणून तृप्ती देसाई परिचित आहेत. नेहमीच वेगवेगळ्या आंदोलनांवरुन चर्चेत असणाऱ्या देसाई यांच्या नावाची चर्चा आता मात्र कोणत्या आंदोलनावरुन नाही तर बिग बॉस मराठी सिजन ३ मधील स्पर्धक म्हणून होत आहे. विविध सामाजिक, राजकीय विषयांवर आपली रोखठोक मते मांडत तृप्ती देसाई कायमच प्रकाशझोतात राहण्याचा प्रयत्न करत असतात. नुकत्याच त्या या रिअॅलिटी शो मधून बाहेर पडल्या असून आपण राजकारणात जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. येत्या काळात महिलांच्या हक्कांसाठी आंदोलनं सुरू राहतील आणि बलात्कारमुक्त महाराष्ट्र ही नवी मोहीम हाती घेणार असल्याचेही तृप्ती देसाई यांनी बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताना सांगितले. जाणून घेऊयात तृप्ती देसाई यांच्याविषयी आणि त्यांच्या आंदोलनाविषयी...
१. कोण आहेत तृप्ती देसाई - तृप्ती देसाई या मूळ कोल्हापूरच्या आहेत. काही वर्षांपूर्वी त्यांचे कुटुंब पुण्यात स्थायिक झाले आहे. त्यांनी पुण्यातील SNDT महाविद्यालयातून होम सायन्सची पदवी घेतली आहे. २००८ मध्ये अजित सहकारी बँक आणि पतसंस्थेविरोधात केलेल्या आंदोलनामुळे तृप्ती देसाई यांची मिडियाने दखल घेतली होती. या बँकेतील गैरव्यवहारांविरुद्ध देसाई यांनी आंदोलन छेडले होते. त्यांनंतर त्या खऱ्या अर्थाने वेगवेगळ्या आंदोलनांमध्ये सहभागी होताना दिसल्या.
२. अशी निर्माण झाली ओळख - सुरुवातीला तृप्ती देसाई अण्णा हजारेंच्या भ्रष्टाचार विरुद्ध आंदोलनात सहभागी होत्या. नंतर त्यांनी बुधाजीराव मुळीक यांच्या भूमाता ब्रिगेड या संस्थेत काम करायला सुरुवात केली. ही संस्था शेतकऱ्यांच्या पत्नींना मदत करण्यासाठी स्थापन करण्यात आली होती. २०१० मध्ये देसाई या संस्थेतून बाहेर पडल्या आणि त्यांनी या नावाशी साधर्म्य असलेली भूमाता रणरागिणी ब्रिगेड ही संघटना सुरू केली. या संस्थेमार्फत त्या महिलांच्या मंदिरप्रवेशाच्या हक्कांविषयी लढा देतात.
३. आंदोलनांची सुरुवात - शनिशिंगणापूर आंदोलनानंतर तृप्ती देसाईंची खरी ओळख निर्माण झाली आणि त्या लाइमलाईटमध्ये आल्या. त्यांच्या या आंदोलनाची दखल राष्ट्रीय पातळीवर घेतली गेली. देवस्थानातल्या मुख्य चौथऱ्यावर महिलांना प्रवेश मिळावा, यासाठी ज्येष्ठ महिला हक्क कार्यकर्त्या विद्या बाळ आणि अॅड. निलिमा वर्तक न्यायलयीन लढाई लढत होत्या. याप्रकरणी त्यांनी हायकोर्टात अपील केली होती. याच दरम्यान तृप्ती देसाई रस्त्यावर उतरल्या आणि आंदोलनाला सुरुवात केली. विद्या बाळ आणि अॅड वर्तक यांच्या न्यायालयीन लढाईला यश आले आणि हा चौथरा महिलांसाठी खुला करण्यात आला. तसेच याठिकाणी इतर काही महिला संघटनांनीही याच विषयासाठी आंदोलन केले होते. असे असतानाही शनिशिंगणापूर चौथरा प्रवेशाचे श्रेय तृप्ती देसाई यांच्या नावावर जाते.
४. एकापाठोपाठ सुरु झाली आंदोलने - शनिशिंगणापूरचे आंदोलन झाल्यानंतर तृप्ती देसाई यांनी हा धार्मिक स्थळांमध्ये महिला प्रवेशाचा मुद्दा लावून धरला. मुंबईच्या हाजी अली दर्ग्यात महिलांना प्रवेश मिळावा म्हणून तृप्ती देसाई यांनी २०१६ मध्ये मोठे आंदोलन केले. महिलांना असलेली बंदी उठवण्यात यावी यासाठी त्यांनी आंदोलन लावून धरले. त्यानंतर कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात, नाशिकच्या त्र्यंबकेश्वर आणि कपालेश्वर मंदिरांच्या गाभाऱ्यात महिलांना प्रवेश मिळावा म्हणूनही त्यांनी आंदोलने केली.
५. काय आहे शबरीमाला प्रकरण - केरळच्या अयप्पा स्वामी मंदिरात परंपरेनुसार 10 ते 50 वयोगटातल्या महिलांना प्रवेशबंदी होती. मात्र सुप्रीम कोर्टाने सर्वच महिलांना मंदिर प्रवेश देणारा निकाल सुनावल्यानंतर हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे शबरीमलात दोन गट एकमेकांसमोर उभे ठाकले होते. एकीकडे सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा आधार घेत काही महिला मंदिरात प्रवेश करणारच असे म्हणणारा एक गट होता तर दुसरीकडे पुरातन काळापासून सुरू असलेली ही परंपरा जपण्यासाठी लढा देणारे भाविक होते. तृप्ती देसाईही याठिकाणी आंदोलन करण्यासाठी आणि मंदिर प्रवेशासाठी पोहोचल्या होत्या. मात्र स्थानिक आंदोलकांनी त्यांना विमानतळाबाहेर येऊ दिले नाही. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये म्हणून विमानतळावरच १४ तास थांबत तृप्ती देसाई यावेळी पुण्यात परतल्या होत्या. हा राष्ट्रीय स्तरावरचा विषय असल्याने त्यांना यावेळीही चांगली प्रसिद्धी मिळाली.
६. पब्लिसिटी स्टंट आणि राजकारणात प्रवेश - तृप्ती देसाई या अनेकदा पब्लिसिटी स्टंट करतात, माध्यमांमध्ये झळकण्यासाठी त्या वेगवेगळी आंदोलने करत असतात असे अनेक जाणकारांचे म्हणणे आहे. ज्या धार्मिक स्थळांना नाव आहे अशाच स्थळांबाबत त्या आंदोलने करतात, लहान मंदिरांबाबत त्या कधीच आंदोलने का करत नाहीत असा प्रश्नही अनेकदा उपस्थित केला जातो. तृप्ती देसाई या माध्यमात मिळालेल्या प्रसिद्धीमुळे मोठ्या झालेल्या कार्यकर्त्या आहेत असेही त्यांच्याबद्दल अनेकदा बोलले जाते. तसेच निवडणुकांच्या दरम्यान तृप्ती देसाई भाजपा, कॉंग्रेस, आप अशा विविध पक्षाच्या कार्यालयांत आणि व्यासपीठावर दिसतात. त्यामुळे त्या ही सगळी आंदोलने केवळ राजकीय प्रवेशासाठी करत असल्याचे म्हटले जाते. त्यांनी स्वत:ही बिग बॉस मराठीमधून बाहेर पडताना हे स्पष्ट केले आहे. ते्व्हा आता त्या कोणत्या पक्षातून आणि कधी राजकारणात येतात हे पाहणे महत्त्वाचे आहे.