इच्छाशक्ती दांडगी असेल तर सगळं काही साध्य करता येतं. त्याचं उदाहरण आहे बिहारमधील ही एक आई. बांका जिल्ह्यातल्या एका २२ वर्षांच्या तरुणीची ही गोष्ट. सध्या बोर्डाच्या परीक्षांचे दिवस आहेत. दहावी आणि बारावीमधील विद्यार्थी कंबर कसून परीक्षेच्या मैदानात उतरले आहेत. मात्र या तरुणीची गोष्टच वेगळी.
तिचं नाव रुक्मिणी कुमारी. ती दहावीच्या परीक्षेला बसली होती, मात्र गणिताचा पेपरच्या सुरु असतानाच तिला वेदना होत होत्या. घरी पोहचत नाही तोच प्रसूती वेदना सुरु झाल्या. बाळही झाले. पण परीक्षा बुडणार, दहावी नापास होणार हे तिला काही बरे वाटेना. तिने ठरवलं परीक्षा द्यायची आणि बाळ झाल्यानंतर पुन्हा विज्ञानाचा पेपर द्यायला ही तरुणी थेट परीक्षा केंद्रात पोहचली.
गरोदर असतानाच रुक्मिणी दहावीच्या परीक्षेसाठी तयारी करत होती. दरम्यान, १४ फेब्रुवारीला तिचा गणिताचा पेपर होता. पेपर दिल्यानंतर तिला प्रसूती कळा सुरु झाल्या. घरापासून जवळ असलेल्या शासकीय रुग्णालयात तिला नेण्यात आले. १५ फेब्रुवारीला सकाळी ६ वाजता तिने एका मुलाला जन्म दिला.
मुलगा जन्माला आल्याचे कळताच घरातील सदस्य आनंदून गेले. पण दुसऱ्या बाजूला रुक्मिणीने असा एक निर्णय घेतला की मी परीक्षा दिलाच. मुलाच्या जन्मानंतर काही तासात तिचा दुसरा पेपर सुरु होणार होता. विज्ञानाचा पेपर देण्यासाठी तिला जायचे होते. सगळ्यांनाच वाटत होते की हे आता कसे जमणार? बाळांतपणानंतर लगेच ती परीक्षेला कशी बसणार?
पण रुक्मिणी ठाम होती ती परीक्षा द्यायला गेलीच...
या संदर्भात बांकाचे जिल्हा शिक्षणाधिकारी पवन कुमार माध्यमांना मुलाखत देताना म्हणाले, ''प्रसूतीनंतर परीक्षा केंद्रात पेपर देणं खरंच कौतुकास्पद आहे. या तरुणीने शिक्षण किती गांभीर्याने घेतले हे लक्षात येते. अनुसूचित जातीतील रुक्मिणी सर्वांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.''
शासकीय रुग्णालयातील डॉक्टर भोला नाथ म्हणतात, ''सुरुवातीला आम्ही रुक्मिणीला परीक्षा देऊ नको, असे म्हणत समजावत होतो. कारण बाळंतपणाच्या अडचणींमुळे तिच्या प्रकृतीवर परिणाम झाला होता. पण ती आपल्या मतांवर ठाम राहिली. तिच्या आग्रहापुढे कोणाचंच काही चालले नाही. तिच्या या निर्णयाचे आम्ही स्वागत केले. तिच्यासाठी एका रुग्णवाहिकेची व्यवस्था केली. तिच्यासोबत काही पॅरामेडिकल कर्मचारी पाठवले. आई आणि मूल दोघेही निरोगी असून, रुक्मिणीने पेपर दिल्याचे देखील मला समाधान आहे.''
रुक्मिणी म्हणते, ''माझ्या मुलाने चांगला अभ्यास करावा, अशी माझी इच्छा आहे. म्हणून मग मी ही पेपर द्यायचं ठरवलं. विज्ञानाचा पेपर चांगला गेला. मला आशा आहे की, मला चांगले गुण मिळतील.''