पाणीपुरी मग ती ठेल्यावरची असो नाहीतर लग्नाच्या स्टॉलवरची. अनेकांसाठी जीव की प्राण असणारी ही पाणीपुरी खाल्ली की अनेकदा आतून आनंदी वाटते. अशाच या आंबटगोड आणि काहीशा तिखट पाणीपुरीचे देशात वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात. कधी मूग घातलेली हेल्दी पाणीपुरी तर कधी जाळ निघणारी पाणीपुरी, कधी आणखी काही. उत्तर भारतात पाणीपुरीला गोलगप्पे म्हटले जाते हेही आपल्याला माहित आहे. शहरातील काही ठरावीक ठिकाणची पाणीपुरी अतिशय प्रसिद्ध असते. लोक आवर्जून त्याठिकाणी पाणीपुरी खाण्यासाठी गर्दी करतात. अनेकदा या ठेलेवाल्यांची पाणीपुरी करण्याची पद्धत आपले लक्ष वेधून घेणारी ठरते. गर्दी असल्याने मन लावून पाणी पुरी करणारा ठेलेवाला तुम्हीही अनेकदा पाहिला असेल. पण जयपूरमधला डान्स करत पाणीपुरी देणारा ठेलेवाला पाहिलात तर तुमच्याही चेहऱ्यावर नकळत एक स्माइल येईल.
तर जयपूरमधील ट्रीपोलिया बाझार येथील हा पाणीपुरीवाला चक्क डान्स करतच आपल्या ग्राहकांना पाणीपुरी देतो. पाणीपुरी करण्यात तो किती तल्लीन आहे हे त्याच्या हालचालींवरुन दिसून येते. जयपूरमध्ये तो पाणीपुरीसाठी प्रसिद्ध असून त्याच्याकडे ग्राहकांची खूप गर्दी असल्याचे दिसते. एका ठराविक लयीत तो पायांच्या हालचाली करत असून भराभर ग्राहकांना पाणीपुरी देत असल्याचे दिसते. गोविंद गोलगप्पा असे त्याचे नाव असून बॉम्बे फूडी टेल्स यांनी त्याचा डान्स करत पाणीपुरी देतानाचा व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.
या व्हिडिओला अनेक लाइक्स मिळाले असून त्यावर अनेक जणांनी कमेंटसही केल्या आहेत. असे नाचत काही केले तर हातात काहीच राहणार नाही, सगळे सांडून जाईल. तर एकीकडे दुसऱ्यांना पाणीपुरी देताना हा भाई आपली तब्येत चांगली ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहे. पाणीपुरीवाल्याचा डान्स करत पाणीपुरी देण्याचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून या हटके पद्धतीचे नेटीझन्स कौतुक करताना दिसत आहेत. आता दिवसभर इतका डान्स केल्यावर त्या व्यक्तीचे पाय दुखून येत नसतील का असा प्रश्नही अनेकांनी उपस्थित केला आहे.