Join us  

ब्लँकेट्स आणि चादरींना कुबट वास येतोय? ६ उपाय, कुबट वास कमी- थंडीत वापरणे सोपे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2022 7:26 PM

6 Ways to get the bad smell out of the stored blankets : बॅगांमध्ये, कपाटात ठेवलेल्या चादरींना कुबट वास येऊ नये किंवा येतच असेल तर काय करता येईल?

हिवाळ्यात जोपर्यंत आपण थंडीने कुडकुडून जात नाही तोपर्यंत एका बॅगेत बांधून ठेवलेला जाडजूड ब्लँकेट् आणि चादरींची किंमत कळत नाही. थंडी सोसवेना झाली की आपल्याला या ब्लँकेट्स, गोधड्या, चादरींची आठवण येते. मग ती बॅग उघडून त्यातल्या गोधड्या आणि चादरी वापरायला घेतो. परंतु वर्षानुवर्षे बंद असलेल्या बॅगेत या चादरी ठेवल्यामुळे त्यांना एक प्रकारचा कुबट वास येतो. मग कितीही वेळा या चादरी धुतल्या तरी तो वास जाता जात नाही. अशावेळी कितीही आवडीची चादर किंवा गोधडी असो ती पांघरूण म्हणून अंगावर घेण्याची इच्छा होत नाही. कधी या दुर्गंधीने आपली झोपमोड होऊ शकते, उलटी किंवा मळमळही होते. कसा घालवायचा हा कुबट वास? (6 Ways to get the bad smell out of the stored blankets).

काय करता येईल?

१. ब्लीचचा वापर - कुबट वास येणाऱ्या चादरी, ब्लॅंकेट्स धुताना नॉन - क्लोरीन ब्लीचचा वापर करावा. एक बादलीत पाणी घेऊन त्यात नेहमीचे डिटर्जंट व नॉन - क्लोरीन ब्लिच घालून त्या पाण्यात या चादरी २ तास बुडवून ठेवाव्यात. नंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्याव्यात. 

२. जाड मिठाचा वापर - वर्षानुवर्षे बॅगेत बंद असल्यामुळे या ब्लँकेट्स किंवा चादरींना बुरशी लागू शकते. अश्या चादरींचा वापर केल्यास आपल्याला त्वचेशी संबंधित काही समस्या उद्भवू शकतात. तेव्हा जाड मीठ बादलीतील पाण्यात विरघळवून घ्यावे. या चादरी त्यात भिजत घालून काही तासांनी स्वच्छ धुवून घ्या. 

३. आफ्टर वॉशचा वापर - आजकाल बाजारात वेगवेगळ्या ब्रॅण्ड्स आणि फ्लेवर्सचे आफ्टर वॉश सहज उपलब्ध असतात. चमेली, गुलाब, लिली यांसारख्या फुलांचा कृत्रिम सुगंध त्या आफ्टर वॉशमध्ये असतो. चादरी धुवून झाल्यावर एका बादलीत पाणी घेऊन त्यात आफ्टर वॉश मिक्स करून घ्यावे. या मिश्रणात चादरी काही काळ ठेवाव्यात. नंतर कडक ऊन्हात वाळत घालाव्यात.

४. व्हिनेगरचा वापर - किचनमधील भांडी स्वच्छ करण्याबरोबरच कपड्यांच्या धुलाईमध्येसुद्धा व्हिनेगरचा वापर केला जातो. ब्लँकेट्स किंवा चादरी धुताना त्यात थोडे व्हिनेगर घालून त्यांची धुलाई केल्यास त्यातलं कुबट वास निघून जातो. 

५. कापूर वडीचा वापर - वापरून झाल्यानंतर या चादरी आपण परत वर्षभरासाठी बागेत बंद करून ठेवतो. चादरी, ब्लॅंकेट्स बॅगेत व्यवस्थित घडी घालूंन ठेवाव्यात. या चादरींच्या घडींमध्ये कापराच्या वड्या ठेवाव्यात जेणेकरून त्यांना कुबट वास न येता कापूराचा सुगंध येईल. 

६. उन्हात वाळवणे - थंडीच्या दिवसात चादरींचा भरपूर वापर होतो. वापरून झाल्यानंतर ब्लँकेट्स, चादरी स्वच्छ धुवून घ्याव्यात व ३ - ४ वेळा त्या कडक ऊन्हात वाळवून मगच बॅगेत भरून ठेवाव्यात.

 

टॅग्स :सोशल व्हायरल