जगभरात नववर्षांचं स्वागत मोठ्या उत्साहात, आनंदात आणि जल्लोषात करण्यात आलं. वर्षाच्या शेवटच्या दिवशी भारतीयांनी ऑर्डर केलेल्या खाद्यपदार्थांची यादी आता ऑनलाईन डिलिव्हरी करणाऱ्या कंपन्यांनी शेअर केली आहे. पार्टी, डिनरसाठी लोकांनी मोठ्या प्रमाणात बिर्याणी, पिझ्झा, कोल्ड ड्रिंक्स, चिप्स ऑर्डर केले. पण याच दरम्यान एका गोष्टीने सर्वांनाच आश्चर्यचकीत केलं आहे.
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला लोकांनी मोठ्या प्रमाणात ऑनलाईन द्राक्ष मागवली आहेत. डिलिव्हरी ॲप्सवर जवळपास ७ पट अधिक द्राक्ष ऑर्डर केली गेली. डिलिव्हरी ॲपवर द्राक्ष इतक्या मोठ्या प्रमाणात ऑर्डर केली गेली की लगेचच आऊट ऑफ स्टॉक झाली. सर्वाधिक ऑर्डर केलेल्या गोष्टींमध्ये जेव्हा द्राक्षाचा समावेश झाला तेव्हा ब्लिंकिटचे सीईओ अल्बिंदर धिंडसा हे देखील आश्चर्यचकित झाले.
अल्बिंदर धिंडसा यांनी सोशल मीडियावर याबाबत एक पोस्ट केली होती. "आज अचानक द्राक्षांची एवढी क्रेझ का आहे? सकाळपासून प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक ऑर्डर केलेल्या वस्तूंपैकी हे एक आहे. आम्ही सामान्य दिवसांपेक्षा आज सात पट जास्त द्राक्ष वितरित केली आहेत" असं धिंडसा यांनी पोस्टमध्ये म्हटलं. तसेच एक ग्राफ देखील शेअर केला आहे.
१२ द्राक्षांचा स्पॅनिश परंपरेशी संबंध
सीईओंना पडलेल्या या प्रश्नाचं उत्तर इंटरनेट युजर्सनेच दिलं आहे. द्राक्षांच्या प्रचंड विक्रीमागे तुफान व्हायरल झालेली स्पॅनिश परंपरा हे कारण आहे असं सांगितलं. स्पेनमध्ये "लास डोसे उवास डे ला सुएर्टे" म्हणजेच "भाग्याची १२ द्राक्ष" ही एक परंपरा आहे. लोक रात्री न्यू ईअर बेल्ससोबत १२ द्राक्ष खातात. ही १२ द्राक्ष प्रत्येक महिन्याचं प्रतिक म्हणून खाल्ली जातात.
१९ व्या शतकाच्या उत्तरार्धात ही प्रथा सुरू झाली जेव्हा एलिकँटमधील वाइनमेकर्सकडे द्राक्ष जास्त झाली होती आणि नवीन वर्षात समृद्धीचं स्वागत करण्याचा मार्ग म्हणून त्यांनी लोकांना ते खाण्यासाठी प्रोत्साहित केलं. ही परंपरा आता सर्वत्र इतकी लोकप्रिय झाली आहे की, भारतातील लोकही नववर्षाचं स्वागत करताना १२ द्राक्ष खातात.