Body Builder Bride : काही दिवसांआधी एका टक्कल पडलेल्या नवरीचे लग्नातील व्हिडीओ व्हायरल झाले होते. या नवरीची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती आणि तिच्या बिनधास्तपणाचं कौतुकही करण्यात आलं होतं. त्यानंतर आता सध्या सोशल मीडियावर एका बॉडी बिल्डर नवरीची चर्चा रंगली आहे. ही महिला नवरीच्या लूकमध्ये तिचे बायसेप्स दाखवताना दिसत आहे. महिलेचा हा वेगळा ब्रायडल लूक लोकांना आवडला आणि काही लोक फोटोंवर तिचं कौतुक करत आहेत तर काही मजेदार कमेंट्सही करत आहेत.
नवरीच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओत ती अनेक दागिने आणि साडी नेसून बॉडी दाखवत आहे. यातून हेही दिसून येतं की, ती तरूणांच्या तुलनेत बॉडी बिल्डींगमध्ये जराही कमी नाही.
नवरीच्या लूकमध्ये आपले बायसेप्स दाखवून सोशल मीडियावर चर्चेत आलेल्या या नवरीचं नाव चित्रा पुरूषोत्तम आहे. ती कर्नाटकमधील एक फेमस बॉडी बिल्डर आहे.मीडिया रिपोर्टनुसार, चित्रानं मिस इंडिया फिटनेस अॅन्ड वेलनेस, मिस साऊथ इंडिया, मिस कर्नाटक, मिस बंगळुरूसारख्या अनेक राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरील स्पर्धा जिंकली आहे.
त्याशिवाय चित्रा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @chitra_purushotham नावानं फेमस आहे. या प्लॅटफॉर्मवर तिचे १ लाख २६ हजार फॉलोअर्स आहेत.
चित्राच्या या व्हिडिओवर यूजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरनं लिहिलं की, 'पती AI तर नाहीये ना?'. तर दुसऱ्यानं लिहिलं की, दागिन्यांसोबत काही मेडल्सही गळ्यात हवे होते. तर जास्तीत जास्त यूजर्सनी चित्राच्या या लूकचं कौतुक केलं आहे.