लहान मुलं खेळात बाहुलीचे लग्न लावतात. इतकेच काय खेळताना अनेकदा ते स्वत: एखाद्या बाहुल्याशी किंवा बाहुलीशी लग्न करतात. लहान वयात तितकी समज नसल्याने आपण असे करतो खरे. पण मोठे झाल्यावर मात्र आपण आपल्याला आवडेल अशा जोडीदाराशीच लग्नाची गाठ बांधतो आणि आयुष्यभर त्याच्यासोबत राहण्याच्या आणाभाका घेतो. लग्न ही आपल्या आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाची आणि अतिशय नाजूक गोष्ट असल्याने त्याबाबत आपण काहीसे जागरुक असतो. आता हे सगळे जरी खरे असले तरी एका महिलेने चक्क कापडाच्या बाहुल्याशी लग्न केल्याची घटना ब्राझीलमध्ये घडली असून त्याबाबत जगभरात चर्चा होत आहे (Brazilian Women Marries a Cloth Doll).
मेरिवोन रोका मॉरेस असं या महिलेचं नाव आहे, अनेक वर्ष ही एकटीच असल्याने तिचा एकटेपणा दूर करण्यासाठी तिच्या आईने कापडाचा एक मोठा बाहुला आणला. आता लहान मुलांना बाहुला आणला तर ठिक आहे पण इतक्या मोठ्या महिलेसाठी बाहुला आणणे म्हणजे मजेशीरच गोष्ट म्हणायला हवी. एकटेपणा घालवण्यासाठी आणलेला हा बाहुला तिला इतका आवडला की तिने त्याची सोबत जास्तच मनावर घेतली आणि थेट त्याच्याशी लग्नच केले. आपल्याला वाटेल हे लग्न कल्पनेतलं असेल पण या लग्नाचा समारंभ करण्यात आला होता. यासाठी पाहुण्यांना बोलावण्यात आले होते, इतकेच नाही तर लग्नात असते त्याप्रमाणे जेवणही ठेवले होते. मॉरेसने सगळ्यांसमोर आपल्या बाहुल्याला अंगठी घातली आणि आपण आपल्या लग्नात करतो त्याप्रमाणे या सोहळ्याचे फोटो सेशनही करण्यात आले. नंतर आपल्याला मुले झाल्याचेही या महिलेचे म्हणणे होते.
आता या महिलेने असे का केले असा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच पडला असेल. तर माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार या महिलेला ऑब्जेक्टोफिलिया नावाचा एक आजार होता. या आजारात व्यक्ती ऑब्जेक्ट म्हणजे वस्तूंवर प्रेम करते. जगात असे काही लोक आहेत जे अशाप्रकारच्या आजाराने ग्रस्त असून ते निर्जीव वस्तूंवर प्रेम करतात. याआधी अमेरिकेत अशाप्रकारची एक घटना समोर आली होती. नॅथियल नावाच्या व्यक्तीचे आपल्या कारवर प्रेम जडले होते. जर्मनीमध्येही एका महिलेचे विमानावर प्रेम जडले. ती रात्रीही हे विमान जवळ घेऊन झोपायची.