Join us  

#Breakthebias : साडी नेसण्याच्या कलेत तरबेज असलेले तरुण; देतात इन्स्टाग्रामवर टिप्स! साडी फक्त महिलांची मक्तेदारी कशी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2022 4:16 PM

#Breakthebias : मुलींनी अमूकच रंग, मुलांनी तमूकच कपडे घालायचे हे कुणी ठरवलं? हे तरुण तोडताहेत जुने संकेत..

ठळक मुद्देकुणी सांगितलं साडी फक्त मुलीच नेसतात.. बघा या तरूणांचे फोटो, तरूणींनाही लाजवतील त्यांचे साडी लूक्स..

‘काय बायकांसारखे कपडे घालतो, साडी काय नेसतो, स्कर्ट काय घालतो..’ ही अशी नावं रणवीर सिंगला तर कायमच ठेवली जातात. त्याहून कडी म्हणजे कुणी असं सांगितलं की मुलंही साड्या नेसतात. किंवा मुलांना साड्या नेसायला आवडतात, तर त्यावरुन किती टिंगल केली जाईल. त्या मुलांना काय काय म्हणून हिणवलं जाईल याचा विचार करा.

 

ते सर्रास होतंच, अगदी गुलाबी शर्ट घातला तरी काय मुलींचे रंग वापरतोस म्हणून पुरुषांना नावं ठेवणारे कमी नाहीत. पण जर महिला पुरुषांचे खरं तर जेंडर न्यूट्रल कपडे वापरू शकतात, तर तरुणांनी साडी नेसली तर त्यात नाकं मुरडण्यासारखं काय आहे? #Breakthebias असे नारे भलेही ते देत नसतील पण आपल्याला आवडतं ते करुन पाहण्याची धमक तर त्यांच्याकडे आहे. अशाच साडी नेसून ती इन्स्टाग्रामवरही मिरवणाऱ्या एका तरुण दोस्तांची ही गोष्ट. ते साडी नेसतात आणि सन्मानाने मिरवतातही.

 

युनिसेक्स फॅशन तर आता चांगली रुळली आहे. मग ते कपडे असो, घड्याळ असो, परफ्यूम असो किंवा मग गॉगल किंवा अगदी बुट असोत. युनिसेक्स फॅशनमध्ये येणारे कपडे आणि ॲक्सेसरीज स्त्री- पुरुष असा भेदभाव करत नाहीत. तसंच आता फॅशन जगतात जेंडर न्युट्रल ट्रेण्ड आला आहे. याचा अर्थ असा की तुमच्या जेंडरनुसार नाही, तर तुमच्या आवडीनुसार, इच्छेनुसार तुम्ही कोणते कपडे आणि ॲक्सेसरीज घालायच्या किंवा नाही घालायच्या हे ठरवा. मुलगा आहे म्हणून अमूकच घाल किंवा मुलगी आहे म्हणून तु हे घालूच शकत नाहीस, असा नियमच मुळी फॅशनच्या या नव्या जगात नाही.

 

म्हणूनच तर आज सोशल मिडियात असेही काही तरूण आहेत, जे बिंधास्त साडी नेसून वावरत आहेत. एवढंच नाही तर साडी कॅरी करण्याची त्यांची स्टाईल आणि नजाकत यासमोर महिलाही फिक्या पडतील. सिद्धार्थ बत्रा हे अशाच तरूणांपैकी एक नाव. इन्स्टाग्रामवर तो त्याचे साडीतले फोटो नेहमीच टाकतो. त्याच्या या फोटोंना भरभरून दादही मिळते. त्याने नुकताच साडीतला एक व्हिडिओ शेअर केला असून यामध्ये तो पांढरा शर्ट आणि काळी पॅण्ट या फॉर्मल कपड्यांमध्ये दिसतो. याच कपड्यांवर तो लाल- काळी साडी नेसतो. साडीचा पदर मानेभोवती फिरवून समोर घेतो आणि त्यानंतर या लूकवर ब्लेझर घालतो.. साडी नेसण्याची त्याची ही स्टाईल तरुणींनाही नक्कीच आवडेल.

 

फॅशन डिझायनर करन विगही असेच.साडी नेसणं त्याला अतिशय आवडतं. त्यामुळे बऱ्याचदा तो साडीमध्ये दिसून येतो. दरवेळी नवनविन पद्धतींनी साडी नेसणे, साडी नेसण्याचे हटके, स्टायलिश प्रकार शोधून काढणे, ही त्याची खासियत. गोल्डन रंगाचं स्लिव्हलेस ब्लाऊज, पांढरी साडी आणि त्यावर मोत्याचा कंठा, हातात छत्री हा त्याचा लूक पाहिला तर चटकन तो तरुण आहे की तरुणी हे समजतंही नाही.

 

त्याच्या इन्स्टाग्राम प्रोफाईलला भेट दिल्यास साडीतले त्याचे एकसेएक भन्नाट लूक समोर येतात.साडी नेसणं हे मोठं नजाकतीचं काम. मात्र साडी फक्त बायकांनीच नेसावी. साडी नेसणाऱ्या मागास, साडी म्हणजे काहीतरी कमी मॉडर्न असे बायस एकेकाळी रुजवले गेले. आता वेळ आहे ते सगळे बायस मोडण्याची. #ब्रेकदबायस (#Breakthebias)असं म्हणण्याची..

 

टॅग्स :जागतिक महिला दिनसोशल मीडियाइन्स्टाग्राममहिलासोशल व्हायरल