लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील सगळ्यात महत्वाचा क्षण असतो. या महत्वाच्या क्षणांचा सोहळा कसा करायचा याचा विचार प्रत्येक जोडपं करत असत. प्रत्येक जोडप्याचे लग्नात घालायच्या ड्रेस आणि ज्वेलरीपासून व्हेन्यू डेकोरेशनपर्यंत प्रत्येक गोष्टीकडे विशेष लक्ष असते. नवरीच्या एन्ट्रीबद्दल बोलायचं झालं तर आपली एंट्री अतिशय खास असावी अशी प्रत्येक नवरीची इच्छा असते. आजपर्यंत आपण लग्नात नाचत किंवा बाईक चालवत एंट्री घेणारी नवरी पाहिलीच असेल. पूर्वीप्रमाणे आता नवरी न लाजता अगदी बिंधास्तपणे लग्न मंडपात एंट्री करताना दिसते. अनेकदा नवरीची धमाकेदार एंट्री सगळ्यांचं लक्ष वेधून घेते. लग्नातील निरनिराळे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत राहतात. सध्या केरळ मधील नवरीच्या एंट्रीचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे(Viral Video Of Bride From Kerala).
या नवरीने आपल्या लग्नात नक्की केलं काय ?
केरळमधल्या गुरुवयूरप्पनच्या मंदिरात वाद्य वाजविणारे सगळे कलाकार व नववधू पारंपरिक वेशात दिसत आहेत. लग्नाच्या दिवशी गुरुवयूरप्पनच्या मंदिरात चेंदा मेलम खेळतानाचा हा व्हिडीओ आहे. चेंदा हे एक दंडगोलाकार पर्क्यूशन वाद्य आहे. केरळमध्ये हे एक सांस्कृतिक वाद्य म्हणून ओळखले जाते. हे वाद्य सहसा केरळमधील भव्य विवाह सोहळे आणि कार्यक्रमांमध्ये वाजविले जाते. मंदिरात चेंदा वाजविणारे शिंकरी मेलम हे कलाकार दिसत आहे. या कलाकारांसोबतच ही नववधू मंदिरात चेंदा वाद्य फार उत्साहात वाजवत आहे. तिचा उत्साह बघून होणाऱ्या नवऱ्याला सुद्धा आपण या सोहळ्यात सहभागी व्हावे असे वाटले. तो नवरा सुद्धा मोठ्या जोशात या सोहळ्यात सामील होऊन नवरीसोबत वाद्य वाजवू लागला. एवढेच नव्हे तर सराईत चेंदा वादक असलेले या मुलीचे वडीलसुद्धा या कलाकारांमध्ये मिसळून वाद्य वाजवू लागले.
नेटकरी काय म्हणतात?
असं पाहायला गेलं तर सगळ्यांच्याच लग्नात वाजंत्री आवर्जून असतात. परंतु आपल्या स्वतःच्याच लग्नात वाद्य वाजवून लग्नाला आलेल्या मंडळींचा उत्साह द्विगुणित करणारी नवरी कदाचित पहिल्यांदाच नेटकऱ्यांनी पाहिली असेल. म्हणूनच सगळे नेटकरी या व्हिडिओच्या फार प्रेमात पडले आहेत. "हृदयाला भिडणारा व्हिडीओ, गुरुवयूरप्पन यांचे वधू - वरांस खूप खूप आशीर्वाद! अशी प्रतिक्रिया एका नेटकाऱ्याने केली आहे. या व्हिडिओत, वधू - वरांनी किती आनंद आणि प्रेम व्यक्त केले आहे ! त्यांचे पुढील वैवाहिक जीवन फार सुंदर असेल याची मला खात्री आहे. अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे. नववधूच्याबाबत बोलताना एका नेटकऱ्याने म्हटले आहे की, ती हे वाद्य वाजवताना किती सुंदर व खुश दिसत आहे. या व्हिडिओला ३५००० पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.