Join us  

भावाने बहिणीला दिले खास सरप्राईज गिफ्ट; बहिण रडलीच ते पाहून..व्हायरल व्हिडिओ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2022 12:52 PM

Brother Surprise Gift for Sister Emotional Viral Video : भावाने खास गिफ्ट दिल्यानंतर बहिणीला भावना अनावर झाल्या आणि रडू कोसळले.

ठळक मुद्दे९० लाख जणांनी व्हिडिओ पाहिला आहे, १४ लाखांहून अधिक जणांनी तो लाईक केला आहे.बहिण-भावाचं अनोखं नातं दाखवणारा हा व्हिडिओ इमोशनल आहे...

भाऊ आणि बहिणीचे नाते किती खास असते हे आपल्याला माहितच आहे. बहिणीच्या मागे कायम आधार म्हणून उभा असलेला आणि कोणत्याही प्रसंगात तिची काळजी घेणाऱ्या भावाची जागा कोणीच घेऊ शकत नाही. बहिणही प्रत्येक टप्प्यावर तिच्या भावासाठी वेगवेगळ्या गोष्टींचे त्याग करत असते. लहानपणी एकमेकांशी भांडणारे आणि दंगा-मस्ती करणारे हेच बहिण भाऊ मोठेपणी मात्र एकमेकांचे छान मित्रमैत्रीण होतात आणि एकमेकांना चांगल्या-वाईट प्रसंगात चांगली साथही देतात. हेच भावा-बहिणीचं नातं सेलिब्रेट करण्याचे दिवस म्हणजे राखीपौर्णिमा आणि भाऊबीज. आयुष्यभर एकमेकांना साथ असली तरी या प्रसंगी भाऊ बहिणीला छानशी भेटवस्तू देत आपल्या या भावना व्यक्त करतो. तर बहिणही त्याच्या उदंड आयुष्याची मागणी करत त्याला ओवाळते (Brother Surprise Gift for Sister Emotional Viral Video). 

(Image : Google)

नुकताच सोशल मीडियावर असाच एक खास व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये भावाने खास गिफ्ट दिल्यानंतर बहिणीला भावना अनावर झाल्या आणि रडू कोसळल्याचे दिसत आहे. एका भावाने आपल्या बहिणीला दुचाकी गिफ्ट केल्याचे या व्हिडिओमध्ये दिसते. विशेष म्हणजे ते देण्याची पद्धतही इतकी छान होती की बहिणीला आधी साधं, छोटं काहीतरी गिफ्ट आहे असं वाटलं. याचं कारण भावाने गिफ्ट रॅप केलेला एक बॉक्स तिच्या हातात दिला. हा बॉक्स उघडल्यावर त्यामध्ये गाडीची चावी मिळाली. त्यानंतर तिला आपल्या भावाने आपल्याला गाडी भेट दिल्याचे समजले. आनंदाचा हा धक्का तिच्यासाठी इतका सुखद होता की त्यामुळे हसता हसता अचिनाक तिच्या डोळ्यात अश्रू तरळले आणि तिने प्रेमाने आपल्या भावाला मिठी मारली. 

या घटनेचा व्हिडिओ उपस्थितांपैकी कोणीतरी कॅमेरात कैद केला. त्यानंतर हा व्हिडिओ इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला. ही गाडी मिळालेल्या तरुणीचे नाव ऐश्वर्या भदाणे असून तिची ही पहिलीच गाडी असल्याचे तिने पोस्टला दिलेल्या कॅप्शनमधून समजते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप जास्त प्रमाणात व्हायरल झाला असून ९० लाख जणांनी तो पाहिला आहे. १४ लाखांहून अधिक जणांनी हा व्हिडिओ लाईक केला असून अनेकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.    

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडिया