सोशल मीडिया म्हणजे सतत काही ना काहीतरी नवीन घडण्याचे ठिकाण जगात कुठे काय चालू आहे याची माहिती मिळण्याचे एकमेव ठिकाण. एखाद्या जागेच्या माहितीपासून ते कुठे खायला काय चांगले मिळते इथपर्यंत आणि जगाच्या कोपऱ्यात घडलेली एखादी घटना समजण्यासाठीचे एक व्यासपीठच. माहिती, फोटो आणि व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला अगदी एका क्लिकवर सतत नवनवीन गोष्टी पाहायला मिळतात. अनेकदा काही फनी व्हिडिओ तर काही भावनिक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात आणि नेटीझन्सही त्याला पसंती देतात. यात लहान मुलांचे व्हिडिओ व्हायरल होण्याचे प्रमाणही बरेच असते. नुकताच असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला असून सोशल मीडियावर या व्हिडिओला मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे. हा क्यूट व्हिडिओ पाहून तुम्हीही थोडा वेळ का होईना नक्की खूश व्हाल.
लहान मुलांसाठी आपली आई आणि त्यानंतर वडील हेच सर्वस्व असतात. आई जरा डोळ्याआड झाली की आईला शोधण्यासाठी सैरावैरा धावत असतात. इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्येही एक लहानगा बाहेरुन घरात येतो. त्यावेळी तो आपल्या आईला शोधायला लागतो. पण पिवळ्या रंगाच्या साड्या घातलेल्या ४ महिला याठिकाणी डोक्यावरुन पदर घेऊन बसलेल्या असतात. या महिला आपल्या हाताने बाळाला जवळ बोलवण्याचा प्रयत्न करतात. पण ते बाळही प्रत्येकीच्या जवळ जाऊन आपल्या आईची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत असते. एकदा ते एका महिलेच्या हातात जातेही. पण चेहराही न पाहताच केवळ स्पर्शाने ही आपली आई नाही हे समजताच ते तिच्या कडेवरुन खाली उतरते.
मग पुन्हा आपल्या आईला शोधायला लागते. चेहरा दिसत नसूनही बाळ आपल्याला ओळखते का हे पाहणाऱ्या आपल्याला बाळ खरंच आईला शोधते का हे पाहण्याची उत्सुकता लागलेली असते. आणि तितक्यात हे बाळ खरंच आपल्या आईच्या कडेवर जाते आणि ती आईही त्याला तितक्याच प्रेमाने जवळ घेते. इन्स्टाग्रामवर status.fan.tranding या पेजवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून अवघ्या ६ दिवसांत ६.५ लाखांहून अधिक जणांनी या व्हिडिओला लाईक केले आहे. इतकेच नाही तर हा क्यूट व्हिडिओ पाहून नेटीझन्स यावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रियाही देत आहेत. त्यामुळे बाळालासाठी आईची माया, स्पर्श किती महत्त्वाचे असते ते या व्हिडिओमधून आपल्याला अगदी सहज समजेल. त्यामुळे सुरुवातीला मजेशीर वाटणारा हा व्हिडिओ भावनिक पातळीवरही आपल्याला खूश करुन जातो हे नक्की.