Join us  

डाळिंब नीट सोलता येतं तुम्हाला, की दाणे कुठे रस कुठे? ही घ्या डाळिंब सोलण्याची परफेक्ट पद्धत..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2021 3:36 PM

तुम्हालाही डाळिंबाचे दाणे काढायचा कंटाळा येतो? सोलताना त्याचा खूप राडा होतो? मग या उपायाने डाळिंब सोलून तर बघा, तुमचे काम होईल सोपे...

ठळक मुद्देसोप्या पद्धतीने डाळिंब कसे सोलायचे पाहा तर खरंजाणून घ्या डाळिंबाचे फायदेही

उत्तम आरोग्यासाठी शाकाहारी पदार्थांमध्ये फळे, भाज्या यांचे खूप महत्त्व आहे. हिवाळ्याच्या दिवसांत बाजारात मोठ्या प्रमाणात फळे आणि भाज्या उपलब्ध असल्याने वर्षभरासाठी तब्येत चांगली ठेवायची असेल तर आहारात फळांचा समावेश ठेवायला हवा. फळांमधून आरोग्याला नैसर्गिकरित्या उत्तम घटक मिळत असल्याने सर्वच वयोगटातील व्यक्तींनी फळे खाणे आरोग्यदायी असते. थंडीच्या दिवसांत उपलब्ध असणारे डाळिंब आता बाजारात दिसायला लागले आहे. पण डाळिंब आणण्याचा आपण अनेकदा कंटाळा करतो याचे कारण म्हणजे ते सोलण्यासाठी लागणारा वेळ, कष्ट आणि पसारा. पण तुम्हीही असे करत असाल तर थांबा.  

सलाईनप्रमाणे काम करणारे डाळींबाचे दाणे खाल्ल्यास शरीराला भरपूर ताकद मिळते. सोशल मीडियावर अनेकदा किचन हॅकस या नावाखाली किचनमधील गोष्टींबाबत सोप्या टिप्स दिल्या जातात, यामुळे महिलांचे काम काही प्रमाणात सोपे होते. त्यात डाळिंबाचे दाणे काढायची पद्धतही दिलेली असते. कधी डाळिंबावर फटके मारुन तर कधी त्याचे साल कलाकारी पद्धतीने गोल गोल कापून हे दाणे कसे काढायचे हे सांगितले जाते. पण आज आपण एक आगळीवेगळी पद्धत पाहणार आहोत त्यामुळे डाळिंब सोलण्याची म्हणजेच डाळिंबाचे दाणे काढण्याची ट्रीक तुम्हाला समजू शकेल    . एका व्टिटर अकाऊंटवर याचा व्हिडियो शेअर करण्यात आला आहे. या व्हिडियोला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पसंती मिळत असून अनेकांनी त्यावर खूप सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. ही टीप सांगितल्यामुळे आपले डाळिंब सोलण्याचे काम सोपे होणार असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. यामुळे वेळ तर वाचेलच पण कष्टही वाचू शकतील. डाळींबाचे टपोरे दाणे जसेच्या तसे मिळण्यासाठी ही पद्धत अतिशय सोपी असून ती तुम्ही नक्की ट्राय करुन पाहा. तसेच डाळींबाचे दाणे एकीकडे रस एकीकडे आणि आतले नको असलेले एकीकडे असा सगळा राडा होतो. हा राडा होऊ नये म्हणून एक सोपी पद्धत पाहूया...

 

१. डाळिंबाला देठाच्या चारही बाजूला काप द्यायचे. २. यानंतर त्याचे देठ आणि चौकोनी भाग ओढून बाहेर काढायचा. ३. मग ज्याठिकाणी आत पांढरे साल दिसेल तिथे सुरीने उभा कट द्यायचा.४. एक एक फोड बाहेर काढून त्याचे दाणे काढा. 

ही डाळिंबचे दाणे काढण्याची अतिशय सोपी पद्धत तुम्हाला पाहायची असेल तर वरील व्हिडियो नक्की बघा. ट्विटरवरील व्हिडियोमध्ये एक व्यक्ती शेतात झाडाला लटकलेल्या डाळिंबावरच हा दाणे काढण्याचा प्रयोग करत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे आधी झाडावरुन तर डाळिंब काढ अशा प्रतिक्रियाही अनेकांनी दिल्या आहेत. पाहूयात डाळिंब खाण्याचे शरीरासाठी असणारे फायदे

डाळींबाचे फायदे 

१. डाळिंबामध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंटस, फायबर आणि व्हिटॅमिन्स असतात. हे घटक उत्तम आरोग्यासाठी आवश्यक असतात.

२. रक्तातील साखरेचे वाढलेले प्रमाण ही सध्या अतिशय सामान्य समस्या झालेली आहे. पण डाळिंबाचे दाणे खाल्ल्यास ही साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते. 

३. डाळिंबामध्ये लोह असते. गर्भावस्थेतील महिलांना किंवा इतर महिलांनाही हिमोग्लोबिन किंवा लोहाची कमतरता जाणवल्यास डाळिंबाचा ज्यूस घ्यावा. त्यामुळे ही कमतरता भरुन येण्यास मदत होते. 

४. शरीराची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी डाळिंबाचे दाणे खाणे फायदेशीर ठरते. त्यामुळे हवाबदल होत असताना डाळिंब खाल्ल्यास ते उपयुक्त असते.  

५. त्वचेचा तजेलदारपणा टिकून राहण्यासाठी किंवा रुक्ष झालेली त्वचा तजेलदार करण्यासाठी डाळिंबाचा फायदा होतो. 

६. अपचन, गॅसेसचा त्रास, पोट साफ न होणे या तक्रारींवर डाळिंब उपयुक्त असते. जुलाब झाल्यासही डाळिंबाच्या बिया न खाता केवळ दाण्यांच्या वरच्या भागाचा ज्यूस दिल्यास आराम मिळतो. 

७. डाळिंबामध्ये मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणात असल्याने ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे त्यांच्यासाठी डाळिंब उपयुक्त आहे. 

८. तोंडाला दुर्गंध येत असल्यास डाळिंबाचे दाणे चावून खावे, त्यामुळे दुर्गंधी निघून जाते. 

९. हृदयविकार होऊ नये म्हणूनही डाळिंब खाणे फायद्याचे आहे. हृदयातील अतिसूक्ष्म रक्तवाहिन्या मोकळ्या ठेवण्याचे काम डाळिंब करते. 

१०. मेंदूचा वेग वाढण्यासाठी डाळींबाचा रस अतिशय उत्तम काम करतो. 

टॅग्स :सोशल व्हायरलट्विटरसोशल मीडियाकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.फळे