कतरिना कैफ आणि विकी कौशल (Vicky Kaushal) यांचा विवाह मोठ्या थाटामाटात झाला.. विवाहानंतर नवदाम्पत्य आता संसाराला लागलं असून कतरिनाने लग्नानंतरची सून म्हणून असणारी पहिली रसम नुकतीच पुर्ण केली आहे... हा विधी पुर्ण करून कतरिना नक्कीच खुश झाली असणार कारण तिने इंन्स्टाग्रामवर तिने केलेल्या शिऱ्याचा (sheera recipe) फोटो टाकून तिचा आनंद चाहत्यांसोबत शेअर केला आहे..
तर त्याचं झालं असं की अनेक चित्रपटांमधून किंवा हिंदी मालिकांमधून दिसून येणारा एक कॉमन सीन कौशल कुटूंबाच्या घरात, कतरिनाच्या खऱ्या खुऱ्या आयुष्यात नुकताच पार पडला आहे. चौका चढाना.. किंवा पेहेली रसोई ही लग्न झाल्यानंतरची एक पुजा घरोघरी केली जाते. फक्त या विधीचे प्रत्येक भाषेनुसार नावं वेगवेगळे आहेत. या विधीमध्ये नव्या नवरीच्या हाताने स्वयंपाक घरातील गॅसची पुजा केली जाते आणि मग नवी नवरी आपल्या हाताने तिच्या नव्या कुटूंबासाठी काहीतरी गोडधोड पदार्थ बनवते... अशी ही रसम कतरिनाने नुकतीच पुर्ण केली आहे.. आता ही रसम झाल्यानंतर नव्या नवरीला कुटूंबातल्या प्रत्येकाकडून काही ना काही गिफ्ट नक्कीच मिळतं.. तसं कतरिनाला काय मिळालं हे अजून गुलदस्त्यातच आहे.
कतरिनाने तिच्या पेहेली रसोई दरम्यान रव्याचा मस्त शिरा केला असल्याचे तिने शेअर केलेल्या फोटोमध्ये दिसून आले.. आता खरंतर ही रसम बघायला, ऐकायला जरी खूप सोपी, छान, मस्त वाटत असली, तरी जी नवरी हे सगळं करते, तिला त्यावेळी जाम टेन्शन आलेलं असतं.. पदार्थ पहिल्यांदा केलेला असला, येत असला तरी सासरच्या मंडळींसमोर आणि ते ही सासुबाईंच्या तालमीत करायचा म्हणजे किती कठीण प्रसंग हे जिचं तिलाच माहिती.. असो कतरिनाने बनविलेला हा पदार्थ झकास झाला होता की नाही, हे तर आपल्याला समजले नाही.. पण तुम्हाला जर छान चवदार शिरा करायचा (how to make sheera) असेल तर खाली दिलेली रेसिपी (sheera recipe in marathi) नक्की करून बघा..
साहित्य
एक वाटी बारीक रवा, तेवढीच वाटी भरून साखर , पाऊण वाटी साजूक तूप, २ वाटी गरम दूध, १ वाटी कोमट पाणी, १/४ टीस्पून विलायची पावडर, बदाम, मनुके, काजू यांचे बारीक काप १/४ वाटी, केसर.
कसा करायचा शिरा ?
how to make sheera
- सगळ्यात आधी तर कढई गॅसवर गरम करायला ठेवा. कढई तापली की त्यामध्ये तूप घालावे.
- तूप चांगले गरम झाल्यावर त्यात रवा टाकावा आणि खमंग परतून घ्यावा. रव्याचा रंग बदलून तो जरा सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतू द्यावा. कारण रवा चांगला परतला गेला नाही, तर शिरा अगदीच बेचव लागतो आणि दिसायलाही पांढराफटक दिसतो.
- यानंतर रवा परतून झाला आणि रव्याचा रंग बदलला की त्यामध्ये दूध आणि पाणी हळूहळू टाकावे. दूध आणि पाणी एकदम ओतू नये. यामुळे शिऱ्यामध्ये गाठी तयार होतात. दूध आणि पाणी टाकताना मिश्रण चमच्याने सारखे गोलाकार ढवळत रहावे.
- यानंतर आता हळूहळू कढईतला शिरा आळून येण्यास सुरूवात होईल. शिरा आळून आला की मग त्यात साखर, केसराच्या ५ ते ६ काड्या आणि विलायची पावडर घालावी आणि पुन्हा एकदा सगळे मिश्रण नीट हलवावे.
- यानंतर कढईवर झाकण ठेवून चांगली वाफ येऊ द्यावी. वाफ आल्यावर गॅस बंद करावा आणि त्यानंतर शिऱ्यावर सुकामेवा टाकावा.