पदार्थांबाबत जगभरात विविध प्रयोग होत असल्याचे आपण नेहमीच पाहतो. हे प्रयोग चांगले असतील तर ते डोक्यावर घेतले जातात. पण जर ते चांगले नसतील तर मात्र लोक त्याला शिव्या घातल्याशिवाय राहत नाहीत. उन्हाळ्याचे दिवस म्हणजे आंब्याचा सिझन. फळांचा राजा असलेल्या या आंब्याची आपण सगळेच आवर्जून वाट पाहत असतो. एकदा आंबे आले की मग आंब्याचा रस आणि पोळी किंवा पुऱ्या हा बेत ठरलेलाच. आमरसासोबत कुरडई किंवा अगदी एखादवेळी तांदळाचे घावणे खाणे ठिक आहे. पण आमरस डोसा तुम्ही कधी ट्राय केलाय? तेही भरपूर चीज घालून. ऐकूनही काय वाट्टेल ते असं वाटल्याशिवाय राहणार नाही. पण हा विचित्र कॉम्बिनेशन असलेला पदार्थ प्रत्यक्षात तयार करण्यात आला आहे (Cheese Aamras Dosa viral Recipe).
इन्स्टाग्रामवरील विश टू टेस्ट आणि फूडी अॅडीक्टेड या दोन चॅनलवरुन हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. ज्यामध्ये एका फूड जॉईंटवर एक व्यक्ती तव्यावर डोसा घालताना दिसतो. त्यानंतर आपण एरवी त्यावर चीज, बटर, बटाट्याची भाजी किंवा साऊथ इंडियन चटणी असं काही ना काही लावतो. पण याठिकाणी डोश्यावर बटर लावल्यानंतर चक्क आमरस घालण्यात आला. इतकंच नाही तर आमरसानंतर त्यावर चीज किसण्यात आलं. आणि त्यावर चिरलेली बारीक कोथिंबीरही घालण्यात आली. त्यानंतर या डोश्याचे ४ भाग करुन त्याचे गोल रोल करुन ते ताटात देण्यात आले आणि त्यासोबत वाटीत पुन्हा आमरस देण्यात आला.
इन्स्टाग्रामवर एका दिवसांत हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. अनेकांनी या व्हिडिओवर वेगवेगळ्या कमेंटस केल्या आहेत. हा साऊथ इंडियन पदार्थांचा अपमान आहे, यापेक्षा उपाशी राहिलेलं बरं अशा काही संतापजनक प्रतिक्रिया नेटीझन्सनी यावर व्यक्त केल्या आहेत. काहीही करता येतं म्हणून ते करायचं असं नाही असंही एकाने म्हटले आहे. तर एकाने आणखी काय काय पाहायला लावणार आहेत असं म्हणत अशाप्रकारच्या प्रयोगांबद्दल नाराजी दर्शवली आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही दोन्ही पदार्थांची अशा पद्धतीने वाट लावल्यामुळे राग आल्याशिवाय राहणार नाही.