'मुन्ना भाई एमबीबीएस' या बॉलिवूड चित्रपटातील जादू की झप्पीचा डायलॉग तुम्ही ऐकला असेल. एखाद्याला प्रेमाने मिठी मारली तर मनाला शांती मिळते, असा समज आहे. मात्र, असेच एक प्रकरण समोर आले आहे, ज्यामध्ये एका व्यक्तीने महिलेला इतक्या जोरात मिठी मारली की तिच्या छातीच्या बरगड्याच तुटल्या. ( Chinese woman sued her coworker after he broke three of her ribs by hugging too tightly)
हे प्रकरण चीनचे असून चिनी महिलेने तिच्या सहकाऱ्यावर खटला दाखल केला आहे. तिच्या सहकाऱ्याने आधी तिला खूप घट्ट मिठी मारली आणि तिच्या छातीच्या तीन बरगड्या तुटल्या. महिलेने सहकाऱ्याला युंक्सी कोर्टात नेले आणि मिठी मारल्यामुळे उपचारात खर्च झालेल्या पैशाची भरपाई मागितली. (Chinese Woman Sues Male Colleague For Hugging Her So Hard That He Broke 3 of Her Ribs)
चीनी माध्यमातील वृत्तानुसार, हा अपघात मे 2021 मध्ये झाला होता. चीनच्या हुनान प्रांतातील युयांग शहरातील एक महिला तिच्या कामाच्या ठिकाणी एका सहकाऱ्यासोबत गप्पा मारत असताना एक पुरुष सहकारी तिच्याकडे आला आणि तिला घट्ट मिठी मारली. मिठी मारल्यानंतर महिलेला वेदना होत होत्या. आयओएलच्या म्हणण्यानुसार तिला छातीत खूप वेदना होत होत्या. डॉक्टरांकडे जाण्याऐवजी तिने छातीवर गरम तेल लावले आणि झोपली. पाच दिवसांनी छातीत दुखू लागल्याने ती महिला रुग्णालयात गेली.
एक्स रे समोर आल्यानंतर उलगडा
एक्स-रे स्कॅनमध्ये महिलेच्या तीन तुटलेल्या बरगड्या दिसत होत्या, त्यापैकी दोन तिच्या उजव्या बाजूला आणि एक डावीकडे होती. नोकरीवर अनुपस्थित राहून रजा घेण्यास भाग पाडल्याने तिचे पैसेही बुडाले. तिला नर्सिंग सेवा आणि वैद्यकीय खर्च देखील द्यावा लागला. तिच्या बरगड्यांमध्ये जखम झाल्याचा कोणताही पुरावा त्याच्याकडे नसल्याचा त्या व्यक्तीने वाद घातला.