आपल्या किचनमध्ये लाकडाचा किंवा प्लॅस्टिकचा चॉपिंग बोर्ड हा असतोच. फळे, भाजीपाला कापण्यासाठी आपण या चॉपिंग बोर्डचा वापर करतो. या चॉपिंग बोर्डचा वापर करून फळे, भाजीपाला आपल्याला हव्या त्या प्रकारांत कापता किंवा चिरता येतात. फळे, भाजीपाला कापून झाल्यानंतर आपण हा चॉपिंग बोर्ड वॉशिंग लिक्विड किंवा साबणाने स्वच्छ धुवून ठेवतो. सतत हे चॉपिंग बोर्ड वापरल्याने कालांतराने या चॉपिंग बोर्डच्या बरोबर मध्यभागी डाग तयार होतात. हे हट्टी डाग रोजच्या धुण्याने सहज निघत नाहीत. असे चॉपिंग बोर्ड बघताना खूपच अस्वच्छ आणि मळलेले दिसतात. तसेच अशा चॉपिंग बोर्डवर कापलेली फळ, पालेभाज्या खाणे हे देखील शरीराला हानीकारक ठरू शकते. अशावेळी एक सोपा घरगुती उपाय करून आपण या चॉपिंग बोर्डवरील डाग सहज काढू शकतो(Cutting Board Cleaning Hack).
चॉपिंग बोर्डवरील डाग घालविण्यासाठी एक सोपा उपाय...
creative_explained या इंस्टाग्राम पेजवरून चॉपिंग बोर्डवरील डाग सहज काढून टाकण्यासाठीचा एक सोपा उपाय दिला आहे. काय आहे उपाय समजून घेऊयात.
साहित्य -
१. बेकिंग सोडा - १ टेबलस्पून २. मीठ - १ टेबलस्पून ३. लिंबाचा रस - १ टेबलस्पून४. कापलेला लिंबू - अर्धा
कृती -
१. सर्वप्रथम चॉपिंग बोर्ड घेऊन ज्या भागावर डाग पडले आहेत ते तपासून घ्या. २. चॉपिंग बोर्डच्या ज्या भागावर डाग पडले आहेत त्या भागावर बेकिंग सोडा, मीठ, लिंबाचा रस घालून घ्या. ३. आता अर्धा कापलेला लिंबू हातात घेऊन बेकिंग सोडा, मीठ, लिंबाचा रस हे मिश्रण जिथे आहे ते एकत्रित करून अर्ध्या लिंबाच्या फोडीने घासून घ्या. ४. चॉपिंग बोर्ड स्वच्छ करण्यासाठी तयार केलेल्या मिश्रणाचा रंग हळुहळु बदलत जाईल. ५. जसजसे आपण लिंबाच्या फोडीने घासून घेणार तसतसे हळुहळु चॉपिंग बोर्ड वरचा डाग निघून जाईल. ६. चॉपिंग बोर्ड व्यावस्थित घासून घेतल्यानंतर स्वच्छ पाण्याने नीट धुवून घ्या.
अशा प्रकारे रोजच्या वापरातील चॉपिंग बोर्डवर पडलेले डाग आपण सहजरित्या घालवू शकतो.