स्वयंपाक घर हा घरातला एक अतिशय महत्त्वाचा भाग. दिवस सुरू झाल्यापासून ते मावळेपर्यंत अनेक घडामोडी स्वयंपाकघरात (kitchen cleaning hacks) होत असतात. दुपारचा थोडा वेळ, हाच काय तो स्वयंपाक घराचा आराम.. त्यामुळे नेहमीच धांदल, गडबड असणारं किचन आणि किचन ओटा दररोजच खराब होतो आणि तो रोजच्या रोज नियमित स्वच्छ करावाच लागतो. ओटा आवरण्याचं काम सोपं व्हावं, स्वयंपाकघर कधीही निटनेटकं स्वच्छ दिसावं, झुरळं- मुंग्या यांचा तिथे वावर नसावा आणि सगळ्यात मुख्य म्हणजे स्वयंपाक घराची स्वच्छता (How to clean kitchen top fast) करताना ते झटपट होऊन तुमचा वेळ वाचावा, यासाठी या काही सवयी स्वत:ला अगदी आतापासूनच लावून घ्या..
किचन ओटा स्वच्छ ठेवण्यासाठी स्वत:ला लावून घ्या या १० सवयी
१. भाज्या चिरणं, लसून सोलणं, भाज्यांची सालं काढणं अशी कोणतीही काम करताना ओट्यावर आधी पेपर टाका आणि त्यानंतर ही सगळी कामं करा. म्हणजे भाज्यांची सालं, टरफलं असं काहीही थेट ओट्यावर पडणार नाही. पेपर उचलून कचरा टाकून दिला की ओटा पुन्हा चकाचक.
२. पोळ्या करताना ओटा सगळ्यात जास्त खराब होतो. त्यामुळे सगळ्यात आधी ओट्यावर कपडा किंवा पेपर टाकून घ्या. म्हणजे कणिक भिजवताना, पोळ्या करताना कणिक थेट ओट्यावर सांडणार नाही. त्यामुळे पोळ्या झाल्यानंतर ओटा स्वच्छ करण्यासाठी फार वेळी जाणार नाही.
३. असंच चहा गाळतानाही करा. ओट्यावर एखादा कपडा टाका. त्यावर कप ठेवा आणि नंतर चहा गाळा. चहाचे थेंब ओट्यावर पडून तो अस्वच्छ होणार नाही.
४. भाज्या चिरल्यानंतर चॉपिंग पॅड, चाकू, पिलर हे सगळं लगेचंच स्वच्छ करून घ्या. कारण ओलसर असल्यावर ते अगदी काही सेकंदातच स्वच्छ होऊन जातात.
५. तसंच मिक्सरचंही करा. मिक्सरचा वापर झाल्यानंतर त्यातला पदार्थ बाहेर काढून ठेवा. मिक्सरच्या भांड्यात लगचेच थोडं पाणी टाका आणि ते पुन्हा मिक्सरला लावून फिरवून घ्या. भांड्याच्या ब्लेडला जे काही पदार्थ लागले असतील ते सगळे लगेचच मोकळे होऊन जातात. यानंतर साध्या पाण्याने पुन्हा एकदा मिक्सर स्वच्छ करून घ्या.
६. ओला कचरा टाकण्यासाठी स्वयंपाकघरात एक छोटंसं डस्टबिन ठेवा. त्याला दररोज प्लॅस्टिकची बॅग लावा. या बॅगेत स्वयंपाकघरातला कचरा टाका आणि ती बॅग रोजच्या रोज बदला.
७. चहा केल्यानंतर गाळणं लगेचच स्वच्छ धुवून टाका. ओलं असतानाच ते चटकन साफ होतं.
८. स्वयंपाक घरात हात पुसायला आणि भांडी पुसायला दोन वेगवेगळे नॅपकिन ठेवा. तसेच ओटा पुसायला आणि गॅस पुसायलाही २ वेगवेगळे कपडे ठेवा.
९. ओटा पुसल्यानंतर लगेचच एक हात ओट्याच्या भिंतीवर मारून ती स्वच्छ करा.
१०. ओटा साफ केल्यानंतर दररोज तेलाची बॉटल, मीठाचे भांडे, तिखट- मसाल्यांचा डबा, फ्रिजचे हॅण्डल, डायनिंगटेबलच्या खुर्च्यांची मागची बाजू यावर कपडा मारायला विसरू नका.
११. फ्रिजमध्ये तसेच शेल्फवर मॅट टाका. या मॅट उचलून साफ करणं सोपं असतं.
१२. चिवडा, लाडू, बिस्किटे यांचे पॅकेट लगेचच रिकामे करा आणि ते ताबडतोब बरणीत भरून ठेवा. यामुळे स्वयंपाकघर आटोपशीर दिसतं.