Join us  

कितीही घासलं तरी किचन सिंक तेलकट-चिकटच राहतं? करा १ सोपा उपाय, सिंक चमकेल नव्यासारखे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2024 8:59 PM

Kitchen Hacks : Cleaning Tips For Kitchen Sink : किचन सिंकची स्वच्छता करणे झाले सोपे. करा झटपट सोपा उपाय...

आपल्या किचनमधील प्रत्येक वस्तू ही स्वच्छ व सुंदर दिसावी अशी सगळ्याच गृहिणींची इच्छा असते. प्रत्येक गृहिणी आपापल्या परीने तीच किचन वेळोवेळी स्वच्छ करुन नीटनेटकं ठेवत असते. काहीवेळा तर सुट्टीच्या दिवशी आपण आवर्जून किचनमधील सगळ्या वस्तू स्वच्छ करतो. असे असले तरीही किचनमधील (Kitchen Cleaning) काही वस्तू या कितीही स्वच्छ केल्या तरीही त्या थोड्याच दिवसात पुन्हा खराब होतात. किचनमधील कपाट, फरशी, काचा, ओटा, टाईल्स, सिंक अशा गोष्टी कितीही स्वच्छ ठेवल्या तरीही त्या वारंवार घाण होतात(Kitchen Hacks : Cleaning Tips For Kitchen Sink).

किचनमधील सिंक हे दररोज वापरात येणारे असते. याच सिंकमध्ये आपण खरकटी भांडी धुतो. सिंकमध्ये खरकटी भांडी धुतल्याने उरलेल्या यांचे कण हे त्या सिंक पाईपमध्ये जाऊन अडकून बसतात. परिणामी हे सिंक पाण्याने तुंबून राहते. याचबरोबर, खरकटी व तेलकट भांडी सिंकमध्ये घासल्याने सिंकवर तेलकट, चिकट असा एक थर तयार होतो. हा तेलकट चिकट थर आपण कितीही घासला तरीही तो जाताजात नाही. असे हे सिंक स्वच्छ करण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे साबण, लिक्विड सोप, फिनाईलचा वापर करतो. काहीवेळा घासणीने घासून स्वच्छ करतो. असे अनेक उपाय केले तरीही स्टीलचे हे सिंक हवे तसे स्वच्छ होत नाही, अशावेळी काही घरगुती साहित्यांचा वापर करून आपण हे सिंक पुन्हा पहिल्यासारखे स्वच्छ व चकचकीत करु शकतो(Easy & Quick way to unclog your kitchen sink).

साहित्य :- 

१. पाणी - १ कप २. व्हाईट व्हिनेगर :- १/२ कप ३. लिक्विड सोप - ३ टेबलस्पून ४. डिटर्जंट - ३ टेबलस्पून ५. बर्फाचे खडे - ५ ते ६ खडे ६. बेकिंग सोडा - २ टेबलस्पून 

कृती :- 

१. एका बाऊलमध्ये एक कप पाणी घेऊन त्यात १/२ कप व्हाईट व्हिनेगर, प्रत्येकी ३ टेबलस्पून लिक्विड सोप व डिटर्जंट घालून त्याचे मिश्रण तयार करुन घ्यावे. हे तयार लिक्विड स्पंजच्या मदतीने सिंकला लावून सिंक घासून घ्यावे. किंवा हे लिक्विड तयार करुन आपण एकदाच बाटलीत भरुन ठेवू शकता, हे बाटलीत भरलेले लिक्विड आपण गरजेनुसार सिंकमध्ये स्प्रे देखील करु शकता. स्प्रे केल्यानंतर स्पंजच्या मदतीने लिक्विड सगळ्या सिंकला लावून घ्यावे. त्यानंतर पाण्याने  सिंक स्वच्छ धुवून घ्यावे. सिंक धुतल्यानंतर एका स्वच्छ कोरड्या कापडाने पुसून घ्यावे. 

२. सिंक पुसून व्यवस्थित कोरडे झाल्यानंतर सिंकच्या बरोबर मधोमध असणाऱ्या ड्रेनेजच्या छिद्रावर ५ ते ६ बर्फाचे खडे टाकावेत. त्यानंतर त्यावर २ टेबलस्पून बेकिंग सोडा भुरभुरवून घालावा. आता त्यावर २ टेबलस्पून व्हाईट व्हिनेगर ओतून बर्फ वितळेपर्यंत हे मिश्रण तसेच ठेवावे. या उपायामुळे सिंकमधून येणारा खरकट्याचा कुबट वास नाहीसा होतो. याचबरोबर सिंक तुंबण्याची समस्या देखील दूर होते.

टॅग्स :सोशल व्हायरलकिचन टिप्सस्वच्छता टिप्स