साफसफाईच्या बाबतीत आपण अनेकदा काटेकोर असतो. घरातील इतर साफसफाईबरोबरच टॉयलेट आणि बाथरुमची सफाई हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे (Cleaning Tips). स्वच्छतेच्या दृष्टीने आणि मुख्य म्हणजे आरोग्याच्या दृष्टीने टॉयलेट-बाथरुम स्वच्छ असणे गरजेचे आहे. आपण मल आणि मूत्र विसर्जनासाठी ज्याठिकाणी जातो ती जागा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छ असणे अतिशय गरजेचे आहे. दररोजच्या घाईत आपण अनेकदा टॉयलेट-बाथरुम घासणे टाळतो किंवा तात्पुरते साफ करतो (How to clean toilet and bathroom). पण यामुळे याठिकाणच्या टाइल्सना आलेला बर तसाच राहतो. आपण आंघोळ करणे, तोंड धुणे अशा शरीराशी निगडित गोष्टी याठिकाणी करत असतो. त्यामुळे ही जागा स्वच्छ असणे आवश्यक आहे. ही जागा ओली असल्याने याठिकाणी कुबटपणा किंवा हवा खेळती न राहणे, भांडे किंवा कपड्यांचे वास असू शकतात त्यामुळे याठिकाणी हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी.
१. हल्ली बऱ्याच ठिकाणी बोअरचे पाणी असते. हे पाणी थोडे जड असल्याने फरशी किंवा टाइल्सचे डाग साध्या पाण्याने किंवा साबणाने निघत नाहीत. अशावेळी टॉयलेट आणि बाथरुम साफ करण्यासाठी हायड्रोक्लोरीक अॅसिडचा वापर करावा. तसेच हल्ली बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे स्टेन क्लिनरही मिळतात, ते वापरावेत.
२. बाथरुममध्ये आणि टॉयलेटमध्ये कुबट किंवा पाईपलाईनचा वास आल्यास आपल्याला अस्वस्थ होते. अशावेळी वेगवेगळ्या कंपन्यांचे एयर फ्रेशनर आवर्जून लावावेत. त्यामुळे याठिकाणची हवा स्वच्छ राहण्यास मदत होते.
३. बाथरुम तसेच टॉयलेटला कोपरे असतात, आपण इतर भाग व्यवस्थित घासतो पण हे कोपरे स्वच्छ न झाल्याने त्याठिकाणी राप चढत राहतो आणि ते काळे होतात. बाजारात कोपरे साफ करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे, आकाराचे ब्रश मिळतात. त्यांचा हे कोपरे साफ करण्य़ासाठी आवर्जून वापर करावा.
४. बाथरुममधल्या नळांना गंज लागणे ही अतिशय सामान्य समस्या आहे. नळ जुने झाले की पाण्यामुळे ते गंजतात अशावेळी नळ बदलण्याआधी काही सोप्या पर्यायांनी त्यावरील गंज काढता येऊ शकतो. यासाठी लिंबू, बेकिंग सोडा, व्हिनेगर, हायड्रोजन पॅरोक्साईड यांसारख्या गोष्टींचा तुम्ही वापर करु शकता.
५. आपण अनेकदा बाथरुम किंवा टॉयलेट धुण्यासाठी एखादे लिक्विड किंवा वासाचे फिनाईल वापरतो. पण त्याबरोबरच एखादवेळी कपड्याची किंवा भांड्याची पावडर या फरशीवर टाकून टॉयलेट-बाथरुमची फरशी स्वच्छ केल्यास त्याने साफ होण्यास आणखी मदत होते. इतकेच नाही तर ही पावडर गॉजवर घेऊन त्याने बाथरुममधील टाईल्स असलेल्या भिंती आणि दरवाजेही साफ होऊ शकतात.