पावसाळा सुरू झाला की उन्हामुळे होणारी लाहीलाही कमी होते आणि हवेत छान गारवा पसरायला लागतो. हे जरी खरे असले तरी हवेत असणारा एकप्रकारच्या दमटपणामुळे विषाणूंची वाढ होते आणि आपण आजारी पडायला लागतो. इतकेच नाही या काळात कुबटपणामुळे किराणा सामानाला बुरशी येणे, कपडे लवकर न वाळणे अशा अनेक समस्या निर्माण होतात. एकसारखा पाऊस पडत राहीला तर ऊन न पडल्याने कपडे दोन ते तीन दिवस वाळत नाहीत. अशावेळी आपल्याकडे कपड्यांचे जास्तीचे सेट असलेले केव्हाही चांगले. कपडे वाळले नाहीत की पुढचे कपडे कुठे वाळत घालायचे असा प्रश्न आपल्याला पडतो. जास्त काळ कपडे ओले राहीले तर त्यांना एकप्रकारचा कुबट वास यायला लागतो. धुतलेले कपडे वेगळे पण पावसात भिजल्यानेही ओले झालेले कपडे वाळायला वेळ लागतो. अशावेळी कपडे लवकर वाळावेत यासाठी कोणते उपाय करता येतील याविषयी...
१. वॉशिंग मशीनला कपडे लावत असाल तर ड्रायर दोन वेळा फिरवा. म्हणजे कपडे जास्त कोरडे होऊनच बाहेर येतील. जेणेकरुन ते लवकर वाळण्यास मदत होईल. तसेच जर तुम्ही हाताने कपडे धुत असाल तर ते जास्तीत जास्त घट्ट पिळा. त्यामुळे त्यातील पाण्याचा अंश पूर्णपणे निघून जाण्यास मदत होईल. एकट्याने जाड कपडे पिळणे जमत नसेल तर दुसऱ्या कोणाची मदत घेऊन कपडे घट्ट पिळा म्हणजे ते लवकर वाळतील.
२. कपडे मोकळ्या हवेत असतील तर ते जास्त लवकर वाळतात. मात्र ते घरात, वरच्या बाजूला बंदिस्त ठिकाणी असतील तर वाळायला वेळ लागतो. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांत कपडे जितके मोकळ्या जागेत वाळत टाकता येतील तितके टाका. दिवसभर आपण घराच्या बाहेर असू तर खोल्यांमध्ये कपडे वाळत घाला. म्हणजे मोकळी हवा लागल्याने ते पटकन वाळतील.
३. बाजारात हल्ली वेगवेगळ्या प्रकारचे ड्रायर उपलब्ध आहेत. ज्यामध्ये धुतलेले कपडे घातल्यानंतर ते कडकडीत वाळूनच बाहेर येतात. त्यामुळे कपडे वाळत घालण्याचे आणि मग ते काढून नीट ठेवण्याच्या कामाची एनर्जी आणि वेळ वाचतो. पुन्हा कितीही पाऊस पडला तरी कपडे कसे वाळवायचे असा प्रश्न पडत नाही.
४. आपण कपडे वाळत घातल्यावर त्यांना एकाच बाजुने हवा लागते. त्यामुळे ते त्याच बाजुने वाळतात. मात्र आतल्या बाजुने ओलेच राहतात. एरवी हवेने ते आतल्या बाजुनेही सहज सुकतात. पण पावसाळ्यात मात्र दमट हवामान असल्याने कपडे आतल्या बाजुने ओलेच राहतात. अशावेळी संध्याकाळी न चुकता कपडे उलट्या बाजुने पलटून ठेवावेत. इतकेच नाही तर आतल्या बाजुने ओले असतील तर पूर्ण उलटे करुन पुन्हा वाळत घालावेत. त्यामुळे ज्याठिकाणी अजिबात हवा लागली नाही तिथूनही वाळतील.