दिवसभराच्या कामाच्या, मनोरंजनाच्या एकूणच वेळापत्रकात झोपेचा विचार नगण्य केला जातो. काम लांबलं, एखादा सिनेमा उशिरापर्यंत पाहिला, पाहुण्यांशी / मित्र-मैत्रिणींशी गप्पा मारता मारता उशिर झाला तर तडजोड फक्त झोपेशी, झोपेच्या वेळेशी होते. शांत पुरेशी झोप ही आरोग्यासाठी, दुसऱ्या दिवसाच्या ऊर्जेसाठी आवश्यक असते. पण या गरजेकडे दुर्लक्ष होतं . असं झाल्यास अपुऱ्या झोपेचा प्रभाव मग दिवसभराच्या कामावर जाणवतो. काम करताना सतत जांभया येतात, झोप येते, काम करणं नकोसं होतं. झोप येते म्हणून काम न करुन कसं चालेल? त्यापेक्षा कामाच्या वेळेस येणारी झोप घालवण्याचे उपाय करणं फायदेशीर ठरतं.
Image: Google
1. काम करताना झोप येत असल्यास जागेवरुन उठून चालून यावं. कामामध्ये 10 मिनिटांचा ब्रेक घेऊन चालून आल्यास ऊर्जा मिळते. शरीरातील. रक्तप्रवाह सुधारतो. चालण्यामुळे मेंदूला आणि स्नायुंना रक्तपुरवठा होतो. झोप येते म्हणून चहा काॅफी घेण्याच्या पर्यायाकडे वळण्यापेक्षा आधी जागेवरुन उठून चालून येण्याचा पर्याय स्वीकारावा. तसेच स्ट्रेचिंगसारखे थोडे व्यायाम केल्यास स्नायुंवर ताण येतो. यामुळे मेंदूची सजगता वाढते. झोप उडते आणि कामातील एकाग्रता वाढते.
2. तासनतास कम्प्युटर स्क्रीनकडे बघून काम केल्यास डोळ्यांवर ताण येतो, डोळ्यांवर झापड येते. अशा वेळेस डोळे बंद करुन शांत बसावं. किंवा बाहेर जाऊज आकाश, झाडं न्हाहाळावीत. यामुळे डोळ्यांनाही ब्रेक मिळतो. निसर्गाकडे पाहून डोळ्यांना, मेंदूला आराम आणि आल्हाद मिळतो. काम करण्याची ऊर्जा मिळते. डोळ्यांवरचा ताण निघून जातो.
Image: Google
3. सतत काम केल्यानं मेंदूला आणि शरीराला थकवा येतो. हा थकवा घालवण्यासाठी ऊर्जेची गरज असते. ही ऊर्जा खाण्यातून मिळते. काम करताना येणारी झोप घालवण्यासाठी हेल्दी स्नॅक्सचा पर्याय निवडावा. प्रथिनंयुक्त पदार्थ खाल्ल्यानं ऊर्जा मिळून झोप उडते.
4. झोप येत असल्यास झोपेवरुन लक्ष हटवणं गरजेचं असतं. यासाठी आपल्या शेजारच्या सहकाऱ्याशी बोलण्याचा पर्याय निवडावा. थोड्याशा गप्पा मारल्यानं कामातही थोडा चेंज मिळतो. काम करताना आलेला आळस निघून जातो. तसेच काम करताना झोप येत असल्यास लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी थोडा वेळ गाणी ऐकावीत. संगीत ऐकावं. या उपायानेही झोप उडते. थोडा वेळ आपल्या आवडीचं काम केल्यानेही झोप उडते. यासाठी थोडा वेळ वाचन करण्यासारखे उपायही करता येतात. यामुळे मेंदुल आराम मिळतो आणि कामाच्या वेळेस मेंदू सजगतेने काम करतो. कामात एकाग्रता वाढते.
Image: Google
5. कामाच्या ठिकाणी योग्य प्रकाश , खेळती हवा असणं आवश्यक आहे. अपुरा प्रकाश, कोंदट वातावरण यामुळे आळस येतो, झोप येते. त्यामुळे लाइट लावणे, पंखा लावणे, खिडक्या उघडणे हे उपाय केल्यास आळस निघून जातो. कामाला ऊर्जा मिळते.