असं प्रत्येक घरी अनेकदा होतं. कणिक जास्त भिजवली जाते आणि मग उरतील म्हणून जास्तीच्या पोळ्या करणं (chapati) आपण टाळतो. मग ही उरलेली कणिक आपण फ्रिजमध्ये ठेवून देतो. पण नंतर जेव्हा आपण या कणकेच्या पोळ्या करतो, तेव्हा मात्र त्या थोड्याश्या वातड होतात. इतर पोळ्यापेक्षा काळपट दिसू लागातात. कोणत्या पोळ्या शिळ्या कणकेच्या आहेत आणि कोणत्या पोळ्या ताज्या कणकेच्या आहेत, हे अगदी चटकन नुसतं बघूनच लक्षात येईल, एवढा त्यांच्यातला फरक असतो. म्हणूनच तर आता शिळ्या कणकेच्या पोळ्या करण्याआधी करून बघा हे काही सोपे उपाय..(tricks for doing soft rotis)
शिळ्या कणकेच्या पोळ्या करण्याआधी....
१. काहीवेळ बाहेर काढून ठेवा...
कणिक फ्रिजमधून काढल्यावर लगेच पोळ्या करायला लागू नका. १० ते १५ मिनिटांच वेळ जाऊ द्या. कणिक ज्या डब्यात घालून ठेवली असेल त्या डब्याचे झाकण उघडून ठेवा. कणकेला बाहेरची माेकळी हवा लागू द्या.
२. गरम पाणी शिंपडा
१० ते १५ मिनिटानंतर कणिक जरा मऊ पडलेली असेल. तिच्यावर जर काही भागात कडकपणा आला असेल, तर तो काढून टाकावा. त्यानंतर पोळपाटावर तो कणकेचा गोळा ठेवा. त्यावर थोडे गरम पाणी शिंपडा. हाताला थोडंसं तेल लावून घ्या आणि कणिक थोडीशी मळून घ्या. कणिकेचं तापमान नॉर्मलला आलं आहे, असं वाटलं की त्यानंतरच पोळ्या लाटा.
३. मोठा गॅस नको..
जेव्हा तुम्ही शिळ्या कणकेच्या पोळ्य कराल तेव्हा गॅस नेहमी मध्यम आचेवर असावा. खूप माेठा किंवा खूपच लहान आचेवर या पोळ्या भाजू नका. कारण दोन्ही प्रकारात पोळ्या कच्च्या राहतात आणि त्यामुळे मग वातड होतात.
ही काळजी पण घ्या..
- अन्न वाया जाऊ नये म्हणून भिजवलेली उरलेली कणिक फ्रिजमध्ये ठेवून त्याच्या पोळ्या करणं हे अतिशय योग्य आहे. पण असं करताना कणिक एक दिवसापेक्षा जास्त शिळी नसेल, याची मात्र काळजी घ्या. कारण जास्त शिळी कणिक तुमच्या मेटाबॉलिझमवर म्हणजेच चयापचय क्रियेवर वाईट परिणाम करते. त्यातुन पोट बिघडणे, पोट दुखणे असे त्रास होऊ शकतात.