लहान मुलं किती करामती असतात हे आपल्याला कोणी वेगळं सांगायला नकोच. आपल्या घरात किंवा आजूबाजूला लहान मुलं असतील तर त्यांच्या हरकतींमुळे आपण अनेकदा चकित होतो. कधी ते आपल्याला घरकामात मदत करतात तर कधी आपण ज्याप्रमाणे घरातल्यांची काळजी घेतो तशी आपली काळजी घेतात. त्यांचा हा समजूतदारपणा पाहून अनेकदा आपल्याला त्यांचे कौतुक वाटल्याशिवाय राहत नाही. अनेकदा मुलं दंगा घालतात, मजामस्ती करतात पण काही वेळा त्यांना परिस्थिती लक्षात येते आणि ते शहाण्यासारखेही वागतात. ते असे वागले की आपल्याला त्यांचे किती कौतुक करु आणि किती नको असे होते. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे (Cute Viral Video of Kid Serving Dosa to Mother).
या व्हिडिओमध्ये एक चिमुकला आपल्या आईला अतिशय प्रेमाने डोसा वाढताना दिसत आहे. एका उलथन्यावर डोसा घेऊन तोल सांभाळत हा मुलगा स्वयंपाक घरातून दुसऱ्या खोलीत येतो आणि अतिशय स्टाइलमध्ये आईच्या ताटात डोसा वाढतो. डोसा वाढल्यानंतर तो परत धावत आत जातो. कदाचित तो पुन्हा आणखी एक डोसा घेऊन येणार असावा. हे चित्र पाहून आपल्यालाही त्याचे अतिशय कौतुक वाटते. मात्र डोसाचा तोल सांभाळताना त्याच्या चेहऱ्यावर असलेले थोडे ताणाचे भावही आपल्याला व्हिडिओमध्ये दिसतात. इतक्या लहान मुलाने इतक्या प्रेमाने डोसा वाढल्याने या आईलाही तो नक्कीच नेहमीपेक्षा गोड लागला असणार यात वाद नाही.
इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ लाखो जणांनी पाहिला असून अनेकांनी तो व्हिडिओ लाइकही केला आहे. सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झालेल्या या व्हिडिओवर नेटीझन्सनी एकाहून एक कमेंटस दिल्या आहेत. कोणी त्याला मास्टरशेफ म्हटले आहे तर कोणी आईवर त्याचे असलेले प्रेम तो किती छान व्यक्त करतो, काळजी घेतो असे म्हटले आहे. हे पॅरेंटस अतिशय लकी आहेत असेही एकाने म्हटले आहे. एकूण काय तर मुलाच्या क्यूटनेसबद्दल त्याचे खूप कौतुक होताना दिसत आहे. हा व्हिडिओ नेमका कुठला आहे हे मात्र अद्याप कळू शकले नाही.