दुचाकी किंवा चारचाकी गाडी असणे हे आता फार काही कौतुकाचे राहीले नाही. गेल्या काही वर्षात आपली जीवनशैली सुधारल्याने दुचाकी किंवा चारचाकी या आता किमान गरजा झाल्या आहेत. एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी आवश्यक असलेली गाडी कॉलेजला जाणाऱ्या मुलांपासून ते अगदी घरकाम करणाऱ्या मावशींकडेही असते. सायकल आता काळाच्या ओघात बरीच मागे पडली. आता व्यायामासाठी सायकलचा वापर करणारे अनेक जण आपल्या आजुबाजूला असतात पण रोजची कामे करण्यासाठी सायकल वापरणाऱ्यांची संख्या बोटावर मोजण्याइतकीच. असे असले तरी ग्रामीण भागात आजही आवर्जून सायकल वापरली जाते. अनेकांकडे तिही नसल्याने त्यांच्याकडे चालण्याशिवाय किंवा बसने जाण्याशिवाय पर्याय नसतो.
मात्र आजही असे अनेक जण आहेत ज्यांना नवीन सायकल तर मिळत नाहीच. पण सेकंड हँड मिळाली तरी तिचे खूप कौतुक वाटते. नुकताच सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एक वडिल आणि त्यांचा लहान मुलगा आपल्या नवीन सायकलची पूजा करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे ते पूजा करत असलेली सायकलही नवीन नसून सेकंड हँड आहे. वडिल सायकलला हार घालून त्यावर पाणी फिरवतात. त्यानंतर ते अतिशय मनोभावे आपल्या या नवीन सायकलला नमस्कार करतात. त्यानंतर हा लहान मुलगाही सायकलला नमस्कार करताना दिसतो.
It’s just a second-hand bicycle. Look at the joy on their faces. Their expression says, they have bought a New Mercedes Benz. pic.twitter.com/e6PUVjLLZW
— Awanish Sharan (@AwanishSharan) May 21, 2022
वडिल सायकलची पूजा करत असताना हा मुलगा अक्षरश: नाचत असतो. त्यामुळे सायकल मिळाल्यावर त्याला होणारा आनंद आपल्याला त्याच्या नाचण्यावरुन दिसतो. ट्विटरवर शेअर करण्यात आलेला हा व्हिडिओ आतापर्यंत ३ लाखहून अधिक जणांनी पाहिला आहे. तर अनेकांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून त्यांच्या आयुष्यातला आनंद कायम असाच राहुदे असे त्यांनी म्हटले आहे. आता या मुलाच्या मनात सायकलवरुन वडिलांबरोबर कुठेकुठे फिरायला जायचे याची स्वप्ने रंगायला लागली असतील. त्यांच्या मागे एक अतिशय ग्रामीण भागात असते तसे बैठे घर दिसत असल्याने त्यांची परिस्थिती काय असेल याचा अंदाज आल्यावाचून राहणार नाही.