भारतात डान्सचे असंख्य प्रकार पाहायला मिळतात. प्रत्येक राज्याचा वेगळा पारंपरिक डान्स, बॉलिवूड, जॅझ, फ्यूजन याशिवाय इतरही अनेक प्रकारचे डान्स मुले शिकताना आणि करताना दिसतात. काहीच नाही तर कोणत्याही गाण्यावर गणपती डान्स तर आवडीने केला जाणारा प्रकार. पण डान्ससाठी आपले शरीर लवचिक असणे आणि आपल्यात भरपूर एनर्जी असणे आवश्यक असते. सोशल मीडियावर बरेचदा काही ना काही व्हिडिओ व्हायरल होताना दिसतात. नेटीझन्स हे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर तर करतातच पण त्याला लाईक आणि कमेंटसही करतात. नुकताच एका तरुणीचा गरबा डान्स (Girl doing Garba Dance) करतानाचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे (Viral Video).
या व्हिडिओमध्ये एक तरुणी गरब्यातील अवघड अशा गिरक्या घेताना दिसत आहे. गरबा म्हणजे गुजरातचे पारंपरिक नृत्यप्रकार, जगभरात प्रसिद्ध असलेला गरबा करण्यासाठी भरपूर एनर्जी लागते. नवरात्रीच्या दिवसांत गरब्याची जोरदार धूम असते. इतकेच नाही तर काही पार्टीमध्येही गरबा हा नृत्यप्रकार आवर्जून केला जातो. गरबा दिसायला सोपा वाटत असला तरी तो थकवणारा असतो. व्हिडिओमध्ये गरब्यातील अवघड अशा गिरक्या तरुणी अतिशय सहजपणे घेत असल्याचे दिसत आहे. जान्हवी दोषी या डान्स शिक्षिकेने इन्स्टाग्रामवर आपल्या डान्स अॅकॅडमीच्या पेजवर हा व्हिडिओ शेअर केला आहे.
सुरुवातीला जान्हवी एका दरवाजापाशी उभी असलेली दिसते. त्यानंतर ती ड्रेसिंग रुममध्ये जाऊन गरब्याचे कपडे घालते आणि पुन्हा हॉलच्या दरवाडापाशी जाते. ती जशी आत जाते तशी हवेत शरीर गोल फिरवून गरब्यातील अवघड अशी ही स्टेप करते. बघता बघता काही सेकंदात जान्हवी एकसलग ३३ फ्लिप करते. आजुबाजूला उभे असणारे लोक तिला टाळ्या वाजवून प्रोत्साहनही देताना दिसतात. मात्र इतकी अवघड स्टेप ती इतक्या सहज करत असल्याने तिचे सर्वत्र कौतुक होताना दिसते. एकसलग इतक्या गोलाकार उड्या मारल्यावर तिला पाहताना आपल्यालाच चक्कर येते की काय असे वाटते. पण तिला मात्र काहीच वाटत नसून ती इतक्या उड्या मारल्यावरही अगदी नॉर्मल दिसते, त्यामुळे तिच्या एनर्जीचे कौतुक वाटल्याशिवाय राहत नाही. हा व्हिडिओ खूप व्हायरल होत असून आतापर्यंत त्याला १३ हजार लाइक्स मिळाले आहेत. अनेकांनी तो व्हिडिओ शेअरही केला आहे. इतक्या गिरक्या घेतल्यानंतरही ती दमलेली किंवा थकलेली दिसत नाही, किंवा तिला चक्कर आल्यासारखेही होत नाही.