डान्स म्हणजे अनेकांसाठी आवडीची गोष्ट असते. लहान मुलेही यामध्ये मागे नसतात. जरा कुठे गाणे वाजायचा अवकाश की ते नाचायला लागतात. या लहान मुलांमध्ये इतका उत्साह असतो की अनेकदा त्यांना नाचायला कारणही लागत नाही. कधी आनंदाने, कधी कोणाला चिडवल्यावर तर कधी आणखी काही कारणाने ते डान्स करताना दिसतात. यासाठी त्यांना गाण्याचे शब्द, बोल काही समजण्याचीही आवश्यकता असतेच असं नाही. नुसत्या म्युझिकवरही ते भन्नाट डान्स करु शकतात. सोशल मीडियावर लहानग्यांच्या डान्सचे असेच काही व्हिडिओ नेहमी व्हायरल होत असतात. नुकताच असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यामध्ये काही आफ्रिकन मुलं डान्स करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे ही मुलं प्रसिद्ध अभिनेता गोविंदाच्या एका गाजलेल्या गाण्यावर डान्स करत आहेत (Dance of African Students on Govida's Song Viral Video on Children's Day).
आता आफ्रिकन आहेत म्हटल्यावर त्यांना भारतीय भाषा किंवा त्या गाण्याचा अर्थ समजत असेल असे वाटत नाही. मात्र तरी त्यांच्यामध्ये असलेला उत्साह आणि त्यांची डान्स करण्याची उर्मी पाहून आपल्यालाही छान वाटते. बाल दिनाच्या निमित्ताने ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. मुलांमधील बालपण, निरागसपण हे कायम राहावे या उद्देशाने देशात बालदिन साजरा केला जातो. या व्हिडिओमधून मुले ज्या पद्धतीने एन्जॉय करतात त्यातून त्यांचे निरागसपण अगदी स्पष्ट दिसून येत आहे. ही मुले आणि मुली पार्टनर चित्रपटातील ‘सोनी दे नखरे...’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत.
ट्विटरवर व्हायरल झालेल्या हा व्हिडिओ पाहून अनेकांना आपले लबालपण आठवले असेल. या व्हिडिओला कॅप्शनही समर्पक अशी देण्यात आली आहे. लहान मुलांना बाल दिन हा त्यांच्या पद्धतीने एन्जॉय करु द्यायला हवा. त्यामध्ये राजकारण किंवा आणखी काही आणून तो दिवस खराब करु नका असे या कॅप्शनमध्ये म्हटले आहे. शाळेच्या ड्रेसमध्ये असलेली ही मुले शाळेच्या मैदानातच अतिशय जोशात नाचत असल्याचे या ३१ सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये दिसते. अवघ्या एका दिवसांत हा व्हिडिओ १ लाखांहून अधिक जणांनी पाहिला असून अनेकांनी तो लाईक करत त्यावर आपल्या प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत.