कोल्डड्रिंक्स, सॉफ्टड्रिंक्सचे अतिसेवन तब्येतीसाठी हानीकारक असते. उन्हाळ्याच्या दिवसात रोज मोठ्या प्रमाणावर लोक अशा पेयांचे सेवन करतात. खूपदा आपण ज्या ठिकाणी खात,पित आहोत त्या ठिकाणच्या स्वच्छतेबाबत विचार केला जात नाही. (Viral Video) सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये मॅकडोनाल्डच्या एका आउटलेटमध्ये एका व्यक्तीला कोल्ड ड्रिंकमध्ये मृत पाल सापडल्याचा दावा केला जात आहे.
ही घटना गुजरातमधील सोला येथील आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, व्हायरल झालेल्या व्हिडिओतील ग्राहकाचे नाव भार्गव जोशी असे आहे. या घटनेचा व्हिडिओही त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. कोल्डड्रिंकच्या ग्लासमध्ये मृत पाल असल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. त्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. (Dead lizard found in cold drink man shared video on social media)
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक मृत पाल कोल्ड ड्रिंकमध्ये तरंगत असल्याचं दिसत आहे. या व्हिडिओमध्ये भार्गव त्याच्या मित्राशी बोलताना दिसत आहे. भार्गव जोशी आणि त्यांच्या मित्रांनी आरोप केला आहे की ते सोला येथील मॅकडोनाल्डच्या आउटलेटमध्ये चार तासांपेक्षा जास्त वेळ बसले होते कारण ते कोणीतरी त्यांच्या तक्रारीची दखल घेईल याची वाट पाहत होते. त्याच्या म्हणण्यानुसार कर्मचाऱ्यांनी त्याला 300 रुपये परत करण्याची ऑफर दिली. भार्गव जोशी यांनी सीलबंद आउटलेटचे छायाचित्र शेअर केले.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ ग्राहक भार्गव जोशी यांनी ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. भार्गवने या व्हिडिओसोबत कॅप्शनही लिहिलं आहे. कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले आहे - हा व्हिडिओ माझ्यासोबत घडलेल्या घटनेचा पुरावा आहे.
कोल्ड ड्रिंकच्या सेवनाचे दुष्परिणाम
१) कोल्ड ड्रिंकमध्ये सुक्रोज हे घटक आढळतात, ज्यापासून फ्रक्टोज तयार होतो. फ्रक्टोजपासून आपल्याला कॅलरीज मिळतात आणि कोल्ड ड्रिंक्समध्ये भरपूर साखर असल्याने वजन वाढू शकते. एका अभ्यासात असे आढळून आले आहे की दररोज साखरयुक्त पेये सेवन केल्याने लठ्ठपणाचा धोका 60 टक्क्यांनी वाढतो.
२) यात ग्लुकोज आणि फ्रक्टोजचे प्रमाण खूप जास्त असते. या पेयांमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असल्याने यकृताला फ्रक्टोज पचवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो. त्यामुळे यकृतात जळजळ होण्याची तक्रार असते.
३) कोल्ड्रिंक्सच्या सेवनामुळे पोटाभोवती चरबी जमा होते आणि पोटाची चरबी वाढू लागते. ज्यामुळे मधुमेह आणि हृदयाचे आजार होऊ शकतात.
४) कोल्ड्रिंक्सच्या अतिसेवनामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण झपाट्याने वाढल्याने इन्सुलिनचे संतुलन बिघडू लागते, ते प्राण घातकही ठरू शकते.
५) कोल्ड ड्रिंक्स आणि सॉफ्ट ड्रिंक्समध्ये भरपूर साखर असते, ज्यामुळे टाइप-2 मधुमेहाचा धोका वाढतो. काही संशोधनात असे आढळून आले आहे की लोक व्यसनाधीन होतात, ज्यामुळे डोपामाइन मेंदूमध्ये सोडले जाते, ज्यामुळे चांगले वाटते.