आपल्याला आपण करत असलेल्या नोकरीचा कंटाळा आला किंवा दुसरीकडे जास्त पगाराची चांगली नोकरी मिळाली की आपण आहे ती नोकरी सोडून देतो. मात्र ही नोकरी सोडताना आपल्याला आपल्या वरिष्ठांना राजीनामा द्यावा लागतो. अनेकदा आपले आपण काम करत असलेल्या ठिकाणी वरिष्ठांशी आणि सहकाऱ्यांशी अतिशय जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झालेले असतात. त्यामुळे ती नोकरी सोडणे आपल्याला भावनिक करणारे असते. तसंच राजीनामा तर द्यायचा आहे पण त्यात मजकूर काय लिहायचा हा आपल्यासमोर यक्षप्रश्न असतो. यावर एका व्यक्तीने अतिशय सोपा उपाय शोधून काढला आहे. त्याने लिहीलेले हे राजीनामापत्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आता ते पत्र व्हायरल होण्यामागे नेमके काय कारण आहे पाहूया.
या व्यक्तीने इंग्रजीमध्ये लिहीलेल्या या पत्रात सुरुवातीला ग्रिटींग्ज म्हणून डिअर सर असं लिहीलं आहे. त्यानंतर पत्राचा विषय म्हणून रेजिग्नेशन लेटर असे लिहीले असून त्यानंतर खाली थेट बाय बाय सर असे लिहीले आहे. त्यापुढे कोणताही मजकूर नसून खाली या व्यक्तीने आपली स्वाक्षरी केली आहे. सर्वात लहान राजीनामा पत्र म्हणून सोशल मीडियावर या पत्रासंबंधी बरीच चर्चा सुरू आहे. साधारणपणे राजीनामा देताना आपण किती काळ या संस्थेत होतो, तेथील कामाचा आपला अनुभव कसा होता. सहकार्याबद्दल वरीष्ठांचे आभार आणि संपर्कात राहुया असा काहीसा मजकूर आपण लिहीतो. मात्र या व्यक्तीने या सगळ्याला फाटा देत अतिशय सोपे आणि सुटसुटीत राजीमानापत्र लिहीले आहे.
आता हे पत्र नेमके कोणी लिहीले आहे? तो व्यक्ती कोणत्या कंपनीत, कोणत्या पदावर काम करणारा होता याबाबत माहिती मिळालेली नाही. मात्र ट्विट करण्यात आलेल्या या पत्राला अनेकांनी रिट्विट केले असून या पत्राविषयी जोरदार चर्चा सुरू आहे. इतकेच नाही तर अनोख्या अशा या राजीनाम्यावर नेटीझन्सनी भरपूर प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी आपल्या राजीनाम्याची गोष्ट सांगितली आहे तर काही वरिष्ठांनी त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्यांनी पाठवलेली राजीनामा पत्रे पोस्ट केली आहेत. एकीने यावर प्रतिक्रिया देताना, “आपण काही वर्षांपूर्वी असेच पत्र लिहीले होते, मात्र तो बॉस इतका वाईट होता की त्याने त्यावर रिप्लाय द्यायचेही कष्ट घेतले नाहीत” असे म्हटले आहे.