कान्स फेस्टिव्हल म्हणजे जणू फॅशन आणि सौंदर्याचा कुंभमेळाच.. फॅशन जगतातलं हॅपनिंग, ट्रेंडिंग असं इथे नेहमीच बघायला मिळतं. यंदाचा कान्स फेस्टिव्हलही त्याला अपवाद नाही. मेकअप, कॉस्च्युम, ॲक्सेसरीज असं प्रत्येक बाबतीतच इथे काही ना काही नवं पाहायला मिळालं.. जे लोकांना आवडलं, त्याचं भरभरून कौतूक झालं, आणि जे लोकांना पटलं नाही, ते जबरदस्त ट्रोल होत गेलं.. अशाच संमिश्र प्रतिक्रिया दीपिकाच्या कान्समधल्या रेट्रो लूकविषयी (retro look) आणि तिच्या साडीविषयीही बघायला मिळत आहेत.
यावर्षीच्या कान्स फेस्टिव्हलमध्ये आठ ज्युरी मेंबरपैकी एक आहे अभिनेत्री दीपिका पदुकोन. त्यामुळे रेड कार्पेटवर तिचं ड्रेसिंग कसं असणार, याविषयी सगळ्यांच्याच मनात उत्सूकता होती. शेवटी एकदा इतर ज्युरी मेंबर्ससोबत दीपिका रेड कार्पेटवर अवतरली आणि सगळेच तिच्या लूकची जबरदस्त चर्चा सुरू झाली. शिमरी सिक्विन प्रकारातली तिची ही साडी सेलिब्रिटी फॅशन डिझायनर सब्यासाची (Sabyasachi) यांच्यातर्फे डिझाईन करण्यात आली आहे. काही जणांना तिचा हा लूक खूपच आवडला आहे, तर काही जण तिच्या या लूकवर नाराजही झाले आहेत.
दीपिकाच्या या साडीवर सोनेरी आणि काळ्या रंगाच्या आडव्या स्ट्रिप्स आहेत. या स्ट्रिप्स पुर्णपणे सिक्विन वर्कने तयार करण्यात आल्या असून त्याला शिमरी लूक देण्यात आला आहे. दोन स्ट्रिप्सच्या मध्ये आणि काठावर साडीवर हॅण्ड एम्ब्रॉयडरीही करण्यात आली आहे. majestic Bengal tiger या थीमनुसार डिझाईन करण्यात आलेली दीपिकाची ही शिमरी सिक्विन ॲनिमल प्रिंटेड साडी सब्यासाचीच्या आकाश तारा कलेक्शनपैकी एक आहे.
“celebrates heritage Indian crafts and techniques through a modern lens.” असे म्हणत या साडीचे वर्णन केले जात असले तरी तिच्या साडीवरचे ॲनिमल प्रिंट मात्र काही लोकांना आवडलेले नाही. 'स्त्री' ला वाघ म्हणणं आणि तिची कर्तबगारी पुरुषी नजरेतून मांडणं.. अशा पद्धतीची टिका तिच्या या साडीवर होत आहे.. दीपिकाचा मेकअप आणि ॲक्सेसरीज यातूनही तिला अतिशय बोल्ड, ॲग्रेसिव्ह लूक मिळाला आहे.