कधी चालता चालता एखादं काम म्हणून किंवा कोणाशी गप्पा मारण्यासाठी आपण फोनवर बोलतो. इतकेच नाही तर अनेकदा दुचाकीवर किंवा चारचाकीतही आपण अगदी बिनधास्त फोन कानाला लावून एका हाताने गाडी चालवतो. याशिवाय चालताना, ड्रायव्हिंग करताना चॅटींग करणारेही आपल्या आजुबाजूला अनेक जण असतात. त्यावेळी आपल्याला त्याचे गांभिर्य लक्षात येत नाही. मात्र आपल्यासोबत किंवा आपल्या आजुबाजूला या गोष्टीमुळे अपघात झाला की आपल्याला असे करणे किती धोक्याचे असते ते लक्षात आल्याशिवाय राहत नाही (Delhi Police Sharing Video of Using Mobiles While Walking and Driving).
मोबाईल हा सध्या प्रत्येकाच्या हातातील ताईत झाला आहे. त्यामुळे अगदी लहानांपासून वयस्कर लोकांपर्यंत आणि समाजातील सर्वच स्तरातील लोकांच्या हातात सतत मोबाईल दिसतो. हा मोबाईल विविध कामांसाठी फायदेशीर असला तरी त्याचा अती प्रमाणात वापर केल्यास तो धोक्याचा ठरु शकतो हे लक्षात घ्यायला हवे. विशेषत: चालताना किंवा ड्रायव्हिंग करताना मोबाईल वापरणे आपल्या आणि इतरांच्याही सुरक्षेसाठी धोक्याचे असते. याबाबत पोलिस, स्वयंसेवी संस्था विविध माध्यमातून जागृती करतात, तरी आपण मोबाईल वापराबाबत फारसे सतर्क असतोच असे नाही. नुकताच दिल्ली पोलिसांनी याबाबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यामध्ये चालताना किंवा ड्रायव्हिंग करताना फोनचा वापर करणे कसे धोकादायक आहे हे अतिशय समर्पकरित्या दाखवण्यात आले आहे.
'कहीं पे निगाहें, कहीं पे निशाना' खतरनाक हो सकता है।
— Delhi Traffic Police (@dtptraffic) November 7, 2022
वाहन चलाते समय ध्यान सिर्फ सड़क पर रखें, मोबाइल पर नहीं।#DelhiPoliceCares#RoadSafetypic.twitter.com/u1ylBANjXy
दिल्ली ट्रॅफिक पोलिस या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून त्याला अतिशय समर्पक असे कॅप्शनही देण्यात आले आहे. 'कहीं पे निगाहें, कहीं पे निशाना' खतरनाक हो सकता है। वाहन चलाते समय ध्यान सिर्फ सड़क पर रखें, मोबाइल पर नहीं। असे या कॅप्शनमध्ये म्हटले आहे. २७ सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये सुरुवातीला लोक चालताना मोबाईलचा वापर करत असतील तर कशाप्रकारे अपघात होतात हे दाखविण्यात आले आहे. आणि शेवटच्या टप्प्यात चारचाकी गाडी चालवताना मोबाईल वापरल्यास काय होते हे दाखवण्यात आले आहे. जेव्हा साधे चालताना मोबाईल वापरल्यास असे होते तर गाडी चालवताना मोबाईल वापरल्यास काय होईल हे लक्षात घ्यायला हवे असा संदेश या माध्यमातून पोलिसांनी दिला आहे. मोबाईलच्या वापरामुळे दिवसेंदिवस वाढत असलेले अपघात लक्षात घेऊन पोलिसांनी अशाप्रकारे जनजागृती केली असावी. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला असून असंख्य जणांनी तो पाहिला असून रिट्विटही केला आहे.