Join us  

न्यूयाॅर्कमध्ये भर रस्त्यात देसी डान्सरचा पुष्पा जलवा! शर्टवर स्कर्ट घालून केला सामी डान्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2022 7:55 PM

शर्टवर स्कर्ट घालून भारतीय तरुणानं मॅनहॅटनच्या रस्त्यावर सादर केला पुष्पा चित्रपटातील सामी डान्स. स्कर्ट  घालून डान्स करण्यामागे दडलीये एक रंजक गोष्ट!

ठळक मुद्देजयनील मेहता हा नृत्य दिग्दर्शक असून लाॅस एन्जलीस येथे डान्सचं प्र्शिक्षण घेत आहे. मॅनहॅटनच्या रस्त्यावर शेकडो लोकांसमओर त्याने स्कर्ट घालून सामी डान्स केला. 

पुष्पा चित्रपटाची क्रेझ फक्त भारतातच आहे असं नाही तर परदेशातही आहे. पुष्पातील डायलाॅग, डान्स परदेशातही हिट आहेत. सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीयो व्हायरल झालाय. हा व्हिडीओ आहे जयनील मेहता नामक 22 वर्षीय भारतीय तरुणाचा. न्यूयाॅर्कच्या मॅनहॅटनच्या रस्त्यावरील या व्हिडीओमध्ये जयनील मेहता शर्टवर स्कर्ट घालून सामीवर बहारदार नृत्य करत असल्याचं दिसतो. 

जयनील मेहता हा नृत्य दिग्दर्शक असून त्याने यापूर्वी अनेक व्हिडीओतून आपला नृत्य जलवा सादर करुन प्रेक्षकांची दाद मिळवली आहे. पण भर रस्त्यात स्कर्ट घालून् सामी गाण्यावर केवळ करायचा म्हणून डान्स केला नाही.  या डान्सच्या मागे एक गोष्ट दडलीये. ही गोष्ट आहे जयनीलच्या आवडीची, त्याच्या मनातल्या भीतीची आणि धाडसाचीही. या डान्सनंतर एक मोठी गोष्ट  साध्य केल्याचं समाधान जयनीलनं मिळवलं. 

Image: Google

जयनील 5 वर्षांचा होता तेव्हापासून त्याला नृत्य करायला आवडायचं. त्याची ही नृत्यातील रुची बघून त्याच्या आईनं त्याला नृत्याचं प्रशिक्षण देण्यासाठी क्लास लावला. एकदा जयनीलनं टीव्हीवर हिंदी चित्रपटातील अभिनेत्रीला लांब पायघोळ लेहंगा घालून नृत्य करताना पाहिलं. ते पाहून त्याला आश्चर्यच वाटलं. असं कसं लांब लेहंगा घालून छान नाचता येतं हा त्याला प्रश्नच पडला होता. त्याने पटकन जावून आईच्या कपाटातून तिचा लेहंगा चोरला आणि स्वत:च्या कपाटात ठेवला. त्या लेहंग्याप्रमाणेच जयनीलनं स्वत:च्या मनात एक गोष्ट लपवून ठेवली . ती गोष्ट म्हणजे चारचौघात लांब लेहंगा घालून नृत्य करण्याची.

Image: Google

आपल्या नातवानं नृत्यातच करिअर करावं ही जयनीलच्या आजोबांची इच्छा. ती पूर्ण करण्यासाठी जयनील अमेरिकेला लाॅस एन्जलीस येथे आला. त्याच्यासोबत आईचा चोरलेला तो लेहंगाही त्याने आणला होता. त्याच्या डोक्यातून लेहंगा घालून नृत्य करण्याचा विचार काही गेला नव्हता पण ती हिंमत त्याला होत नव्हती. एकट्यानं त्यानं ते करुनही पाहिलं पण चारचौघात करण्यास त्याचं मन धजावत नव्हतं. पण पुष्पा चित्रपटातील सामी या गाण्यानं त्याला ही हिंमत दिली आणि त्याने मॅनहॅटनच्या वर्दळीच्या रस्त्यावर शेकडो लोकांसमोर शर्टवर स्कर्ट घालून सामीवर बहारदार नृत्य सादर केलं. तिथे उपस्थित लोकांना जयनीलच्या नृत्य कौशल्याचं कौतुक वाटलं. कोणी त्याचे फोटो काढत होते तर कोणी व्हिडीओअ शूट् करत होते. 

समाज माध्यमावर जयनील मेहताचा हा स्कर्टवरचा सामी डान्स सध्या धुमामूळ घालतोय. तुझ्या नृत्यात लचक, मोहकता, अदा, नजाकत असं सर्व काही असल्याची दाद लोकांकडून मिळत आहे. अनेकांनी जयनीलचं कम्पलिट परफाॅर्मर म्हणून कौतुक केलं आहे. 60 सेकंद स्कर्ट वर एवढं बहारदार नृत्य सादर करणं सोपी गोष्ट नाही असं म्हणत जयनीलच्या या हिंमतीलाही लोकांनी दाद दिली आहे. 

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडियापुष्पा