‘साड्डी ज्युलिएट’ किंवा ‘बर्फजीत कौर’ अशा नावानं कदाचित आताही तुमच्याकडे स्नो -वूमनचा फोटो व्हायरल होत आला असेल. ‘कॅनडीयन पंजाबी’माणसाने बनवलेली देसी स्नो वूमन म्हणून हा फोटो इंटरनेटच्या चक्रात व्हायरल होतो आहेच. मात्र तो फोटो यंदाचा नाही. साधारण २०१८ ची ही गोष्ट. त्यावर्षी पहिल्यांदा इंटरनेट तोडलं ते या स्नो वूमन अर्थात बर्फजीत काैरने! तेव्हापासून दरवर्षी ख्रिसमसच्या आसपास इंटरनेटवर पुन्हा पुन्हा तिचे फोटो व्हायरल होत असतात. (snow-woman- Barfjeet kaur)
(Image : Google)
मात्र मूळ गोष्ट जुनी आहे. २०१८ ची. ‘ब्लॉग टू’ नावाच्या एका ब्लॉगने पहिल्यांदा हा फोटो प्रसिध्द करत ब्लॉग लिहिला. कॅनडातल्या ब्रॅम्पटनची ही गोष्ट. तिथं दलजीत नावाचा एक भारतीय पोहोचला. तो त्याचा कॅनडातला पहिलाच विण्टर आणि पहिलाच ख्रिसमस होता. जस्सू नावाच्या एक नातेवाईक मुलीने ( काही ठिकाणी तिचं नाव इशा होतं असाही उल्लेख आहे.) त्याला घरी बोलावलं आणि सांगितलं की स्नो मॅनच कशाला आपण स्नो वूमन बनवू. आणि ती ही देसी स्नो वूमन बनवू. त्यावर मग त्यांनी काम सुरु केलं. आणि मग एकदम पंजाबी तोंडावळ्याची, देसी स्नो वूमन त्यांनी तयार केली. तिचे ठळक दागिने, थोडा डार्क मेकअप, लाल दुपट्टा अशा रंगरुपाची ही कॅनडात स्नो वूमन तयार झाली.
तिचे फोटो इंटरनेटवर पडताच तिनं शब्दश: इंटरनेट तोडलं. अनेकांनी बर्फजीत कौर म्हणत तिच्याविषयी पोस्ट केलं. हॅशटॅग व्हायरल झाला. आता दरवर्षी आता ख्रिसमसच्या सुमारात तिचे फोटो व्हायरल होता. ‘बर्फजीत कौर’ अशी दरवर्षी भेटीला येते. आनंद वाटण्याच्या दिवसात काही क्षण आनंदाचे असेही हसरे होतात.