Join us  

वाट लावली पाणीपुरीची! 'चॉकलेट गोलगप्पा' व्हिडिओ पाहून नेटिझन्सचा चढला पारा; पाणीपुरीचा घोर अपमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2022 3:23 PM

पदार्थाची वाट लावण्यासाठी काय करता येईल त्याचे उत्तम उदाहरण

ठळक मुद्देलोक कोणत्या पदार्थासोबत काय प्रयोग करतील सांगता येत नाही. अशी पाणीपुरी तुम्ही नक्कीच कधी ट्राय केली नसेल...

ऐकावं आणि पाहावं ते नवलच, तुम्हा आम्हा सर्वांची आवडती पाणीपुरी म्हणजे पुऱ्यांमध्ये भरलेले आंबट-तिखट पाणी आणि त्याची छान चटपटीत चव. वाचूनही तोंडाला पाणी सुटेल असा हा पदार्थ खाण्यासाठी कित्येक जण पार वेडे होऊन जातात. भारतात अनेक शहरांत चौकाचौकात असणाऱ्या पाणीपुरीच्या ठेल्यांच्या बाजूला असलेली गर्दी आपण सगळेच पाहतो. त्यामुळे या पदार्थावर भारतीयांचे किती प्रेम असेल हे वेगळे कोणी सांगायला नको. पण या पाणीपुरीचे बरेच प्रयोग होताना दिसतात. त्यामध्ये कधी मॅगी भरली जाते तर कधी आणखी काही. पण एकाने तर चक्क आता ही पाणीपुरी चटपटीत नाही तर गोड तेही चॉकलेटची केली आहे. पाणीपुरीवर मनापासून प्रेम करणाऱ्या आणि तिचे नाव काढले तरी तोंडाला पाणी सुटणाऱ्यांना हे ऐकून किंवा पाहून राग आल्याशिवाय राहणार नाही. आपण विचारही करु शकणार नाही इतकी बोगस रेसिपी एका व्यक्तीने केल्यामुळे नेटीझन्स या व्यक्तीवर खूप चिडलेत. 

इंदौरमधील एकाने पाणीपुरीची पार वाट लावली आहे. त्याने पाणीपुरीच्या पुऱ्या चॉकलेटमध्ये घोळवून घेतल्या आहेत. इतकेच नाही तर आपण ज्याठिकाणी बटाटा किंवा पांढऱ्या वाटाणे किंवा बुंदी घालतो त्याऐवजी त्याने पाणीपुरीमध्ये चॉकलेटचे बारीक तुकडे भरले आहेत. त्यानंतर त्यावर रबडीसारखी दिसणारी एक गोष्ट घालतो. मग चॉकलेट सॉस आणि सगळ्यात वरती काजू. त्यामुळे चटपटीत नाही तर गोड पाणीपुरी पाहून नेटीझन्सचे डोके फिरले आणि त्यांनी या व्यक्तीला काहीबाही बोलणे सुरू केले. इन्स्टाग्रामवर व्हिडिओच्या खाली प्रतिक्रिया देत नेटीझन्सनी आपला राग व्यक्त केला आहे. मम्मी का ढाबा असे या इन्स्टाग्राम पेजचे नाव असून हा चॉकलेट पाणीपुरीचा व्हिडिओ भलताच व्हायरल झाला आहे. 

एकाने चिडून या पाणीपुरीत थोडे विष पण घाला असं म्हटलंय, तर दुसऱ्याने पाणीपुरीला पण सोडत नाहीत म्हणत आपला राग व्यक्त केलाय. अनेकांनी आपली नेहमीची पाणीपुरीच मस्त असल्याचे म्हणत अशी कधी पाणीपुरी असते का म्हणत नाक मुरडल्याची स्मायली टाकलीये. काहींनी हा पाणीपुरीचा अपमान आहे असेही म्हटले आहे. तर काहींनी या आगळ्यावेगळ्या पाणीपुरीचे कौतुक करत ट्राय करायला हरकत नाही असेही म्हटले आहे. चॉकलेटचे सँडविच किंवा आणखी काही ठिक आहे, पण पाणीपुरी म्हणजे काहीही. त्यामुळे आपल्याकडे एखाद्या पदार्थाबरोबर काय आणि कसा प्रयोग केला जाईल हे सांगता येत नाही. पण तुम्हालाही  काही वेगळं ट्राय करायची इच्छा असेल तर ही आगळीवेगळी पाणीपुरी तुम्ही आवर्जून ट्राय करु शकता.

टॅग्स :सोशल व्हायरलपाककृतीइन्स्टाग्रामसोशल मीडिया