कधी घाई-गडबडीत तर कधी विसरभोळेपणामुळे बऱ्याचदा आपल्या काही वस्तू हरवतात. या वस्तू फारशा महत्त्वाच्या आणि किमती नसतील तर आपण त्या फारशा शोधण्याच्या भानगडीत पडत नाही. पण या वस्तू महागामोलाच्या असतील तर मात्र आपण त्या सापडेपर्यंत शोधत राहतो. दागिन्यासारखी एखादी किमती वस्तू हरवली तर मात्र आपल्याला त्याची हुरहूर लागून राहते. बरेच दिवस आपण ही वस्तू शक्य त्या सगळ्या ठिकाणी सो़डतो आणि नंतर नाद सोडून देतो. नुकतीच एक अजब घटना घडली असून एका महिलेला थोड्या-थोडक्या नाही तर तब्बल २१ वर्षांनी तिची हरवलेली डायमंडची अंगठी सापडली आहे (Diamond Ring Lost 21 Years Ago Found in Toilet).
अमेरिकेतील फ्लोरिडा इथे राहणाऱ्या शायना डे यांच्यासोबत हा प्रकार घडला. घराच्या डागडुजीचे काम करत असताना प्लंबरने त्यांना टॉयलेटचे सीट बदलण्याबाबत सांगितले. महिलेने हे काम करण्यास होकार दिल्यानंतर हे काम सुरु करण्यात आले. त्यावेळी प्लंबरला टॉयलेट सीटच्या खाली एक डायमंड रींग सापडली. त्याने प्रामाणिकपणे ही रींग महिलेला दिली. ती पाहून महिलेला आश्चर्याचा धक्का बसला. कारण ही रींग हरवून तब्बल २१ वर्ष लोटली होती.
ही अंगठी या महिलेसाठी खूप खास होती कारण तिच्या नवऱ्याने एंगेजमेंट रींग म्हणून तिला ही घातली होती. विशेष म्हणजे ऐन लग्नाच्या आधीच ही अंगठी हरवल्याने त्यावेळी आपण ती खूप शोधल्याचे ही महिला म्हणाली. या अंगठीची किंमत समजू शकली नसली तरी ती डायमंडची असल्याने खूप महाग असावी असा अंदाज आहे. मात्र इतक्या वर्षांनी आपली हरवलेली अंगठी सापडल्याने या महिलेचा आनंद गगनात मावत नव्हता. आनंदाने तिने ही गोष्ट सोशल मीडियावरही शेअर केली. मात्र नशीब कधी काय गोष्ट समोर आणेल हे सांगता येत नाही हेच या निमित्ताने पुन्हा एकदा दिसून आले.