Join us  

मुलांनी भिंती रंगवून खराब केल्या? ४ घरगुती सोपे उपाय, भिंती चमकतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2022 5:03 PM

Cleaning Wall Paint Home Ideas भिंतीवरील डाग आणि पेंटिंग पाहून चिंतेत पडलात, घरातील साहित्य करतील डाग काढण्यासाठी मदत..

आपली खरी ओळख आपल्या घरातील माणसं आणि घराशी जोडलेली असते. आपण आपल्या घराला सावरण्यासाठी आणि त्याला सजवण्यासाठी खूप काही करतो. घराला रंग देण्यापासून ते विविध वस्तू आणण्यापर्यंत आपल्या घराला काय शोभून दिसेल याची काळजी घेत असतो. परंतु, घरातील लहान पोरं घर व्यवस्थित ठेवतील तर ना. लहान मुलांना भिंतींवर चित्र काढायला खूप आवडतं. मुलांसाठी घरच्या भिंतीपेक्षा चांगला कॅनव्हास कोणताच नसतो, आपली सगळी कला ते भिंतीवर रेखाटून आपल्या आई बाबांना दाखवतात. मात्र, आई बाबांना घरातील भिंत साफ करता करता नाकीनऊ येतात. अधिक कष्ट न घेता जर आपल्याला भिंत साफ करायची असेल तर,काही घरगुती उपायांना फॉलो करून भिंतीवरील हट्टी डाग काढू शकता.

क्लिनर करेल मदत

वॉशेबल पेंट साफ करण्यासाठी क्लिनर आपल्याला मदत करेल. हे क्लिनर आपल्याला बाजारात सहजरीत्या उपलब्ध होतील. आपण घरच्या घरी देखील क्लिनर बनवू शकता. एका भांड्यात गरम पाणी घ्या. त्या गरम पाण्यात डिटर्जंट आणि अर्धा लिंबूचा रस चांगले मिसळा. हे मिश्रण स्प्रे बाटलीत ओता आणि कोणत्याही डाग असलेल्या भागावर शिंपडा. स्पंजच्या सहाय्याने भिंतीवरील डाग चांगले साफ करून घ्या.

बेकिंग सोडा दाखवेल जादू

बेकिंग सोडाचा वापर आपण जेवणासह इतर कोणत्याही गोष्टीत करू शकता. त्याला एक उत्तम क्लिंजिंग एजेंट मानले आहे. याचा वापर केल्याने आपल्या भिंतीवरील डाग सहजरीत्या निघण्यास मदत होईल. सर्वप्रथम बेकिंग सोडा पाण्यात मिसळा. हे मिश्रण भिंतीवर शिंपडा, आणि कापडाच्या मदतीने भिंत साफ करून घ्या. असे केल्याने भिंतीला नवी चमक मिळेल.

टूथपेस्ट आणि व्हिनेगर

टूथपेस्ट आणि व्हिनेगर भिंतीवरील डाग काढण्यासाठी खूप मदतगार आहे. व्हिनेगरपासून लिक्विड तयार करण्यासाठी एका कपमध्ये अर्धा कप पाणी घ्या आणि अर्धा कप व्हिनेगर घ्या. स्प्रे बॉटलमध्ये हे मिश्रण ओता. आता हे मिश्रण भिंतीवर शिंपडा. स्क्रबरच्या सहाय्याने डाग घासून घ्या. फक्त टूथपेस्टने देखील आपण भिंत साफ करू शकता.

साबणाचं पाणी

भिंती साफ करण्यासाठी साबणाचं पाणी वापरा. स्क्रबरच्या सहाय्याने भिंत साफ करा. यामुळे डाग हळूहळू निघून जातील. याचा वापर करून आपण घरातील प्रत्येक भिंत साफ करू शकता.

टॅग्स :सुंदर गृहनियोजनचित्रकलाहोम रेमेडी